ज्ञान नको.. वेळ वाढवून द्या.. नाहीतर मार्केट बंद करू; नगरच्या व्यापाऱ्यांचा महापालिकेला इशारा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनासंदर्भातील नियम व कायद्यांचे ज्ञान आम्हाला नको आहे...मूग व अन्य शेतमालाची आवक वाढत असल्याने मार्केट यार्डची वेळ वाढवून द्या, नाहीतर मार्केट कमिटीत शेतमाल खरेदी-विक्रीचे काम व्यापारी थांबवतील, असा स्पष्ट इशारा आडते बाजार मर्चंटस असोसिएशनने दिला आहे. अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना स्पष्ट पत्रच दिले आहे.

बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वेळ दिली आहे. मात्र, सध्या मुगाची आवक वाढली असल्याने त्याच्या खरेदी-विक्रीचे काम सायंकाळी ५नंतरही चालते. रविवारी ते असेच सुरू असताना काही शासकीय अधिकारी तेथे आले व त्यांनी निर्धारित वेळेनंतरही काम सुरू ठेवणारांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईला अध्यक्ष चोपडा यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनीही आक्षेप घेतला. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटीतील व्यापारी व्यवहार बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

याबाबत चोपडा यांनी सांगितले की, बाजार समितीत सध्या मुगाची आवक वाढली आहे. आलेल्या मालाची प्रतवारी करणे, तो उतरवून घेऊन संबंधित शेतकऱ्याच्या नावाने नोंदवणे, त्याचा लिलाव करणे, विक्री झाल्यावर मालाचा वजन-काटा करून वाहनात वा बैलगाडीत माल टाकणे, शेतकऱ्याला मालाचे पैसे देण्यासारखी कामे दुकानदार व्यापारी, खरेदीदार व्यापारी, दिवाणजी, मुनिमजी, हमाल कामगार, बैलगाडीवाले, टेम्पोवाले, ट्रकवाले करीत असतात. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर केला जातो. सकाळी ९ ते ५ या वेळेतच ही कामे करण्याचा कटाक्ष असतो. पण मालाची आवक वाढल्यावर थोडा उशीर होता. रविवारी असा उशीर झाल्यावर काही शासकीय अधिकाऱ्यांनी तेथे येऊन व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली व कायद्याचे भरपूर ज्ञान दिले. शेतकऱ्यांच्या मालाची वेळेचे बंधन न पाळता विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळे सर्वजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असताना शेतमालाची आवक वाढल्यावर बाजार समितीत काम करण्याची वेळ वाढवली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कामात व्यस्त असलेल्या व्यापाऱ्यांचा गौरव तर सोडाच, पण त्यांना अपराधी व गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जाते. दादागिरी, मारहाण व दंड आकारणी होत असल्याने त्याचा मर्चंटस असोसिएशन निषेध करीत आहे, असे या पत्रात चोपडांनी स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे शेतमालाचे व्यवहार करण्यास वेळेचे बंधन नसावे, काम पूर्ण करण्याची व उशिरा घरी जाण्याची परवानगी व्यापाऱ्यांना मिळावी, नाहीतर शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीत व्यापारी व्यवहार बंद करण्याचा निर्णय मर्चंटस असोसिएशन घेईल, असा इशाराही चोपडांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post