तबलिगीच्या बदनामीबद्दल मनपाने माफी मागावी; 'एमआयएम'ची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकाद्वारे तबलिगी जमातीची बदनामी केल्याबद्दल महापालिकेने माफी मागण्याची मागणी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेझ अशरफी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अहमदनगर शहरात जेव्हा तबलिग जमातचे नागरिक सापडले, तेव्हा ते येथे अडकले की लपून बसले, याची शहानिशा न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. अहमदनगर महापालिकेने दिल्ली मरकज, तबलिग जमात, हजरत निजामुद्दीन यांच्या विरोधात ध्वनिक्षेपक लावून महापालिका क्षेत्रात असे वातावरण निर्माण केले की, कोरोना या देशात तबलिग जमातमुळे आला. यामुळे अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाला मानसिक छळ सहन करावा लागला. उच्च न्यायालयाने आता निर्णय दिला आहे की जमातला बळीचा बकरा केला आहे. त्यामुळे आता तबलिगी जमातला बदनाम करणारांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे, असे डॉ. अशरफी यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर शहरात तबलीग जमातसंदर्भात ध्वनीक्षेपकाद्वारे बदनामी करणारे महापालिका अधिकारी व त्यांनी ज्यांच्या आदेशाने हे केले, त्यांच्यावर कारवाई करावी. ज्याप्रकारे अहमदनगर महापालिकेने ध्वनीक्षेपकाचा वापर करून तबलीग जमात, मरकज, पीर हजरत निजामुद्दीन यांची बदनामी केली, त्याच प्रकारे त्याच ध्वनीक्षेपकाद्वारे आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर माफी मागावी, अशी मागणी अशरफी यांनी केली आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post