गडाखांचा सेना प्रवेश.. औपचारिकता की राजकीय फायदा?


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मनाने शिवसेनेसमवेत असलेले व राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद मिळवलेले नेवाशाचे युवा नेते शंकरराव गडाख यांनी मंगळवारी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. बहुतांश वेळा लोकसभा वा विधानसभा निवडणुकांच्या काळात या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या आयाराम-गयाराम मंडळींची चर्चा होत असते. पण आताच्या काळात कोणत्याही निवडणुका नसताना तसेच मनाने शिवसैनिकच झालेल्या शंकरराव गडाखांनी मंगळवारी शरीराने म्हणजे आता तन व मनाने अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करण्याचा उडवलेला धमाका जिल्ह्याच्या राजकीय विश्वात चर्चा घडवून गेला आहे. त्यामुळेच मनाने शिवसैनिक झालेल्या गडाखांनी औपचारिकता म्हणून शिवसेनेत प्रवेश केला की, जिल्ह्यात निर्माण झालेली शिवसेना नेतृत्वाची पोकळी भरून काढून जिल्हा सेना आपल्या पंखाखाली घेण्याच्या राजकीय फायद्यासाठी हा प्रवेश केला, याचे उत्तर भविष्यकाळातील शिवसेनेची व गडाखांची वाटचालच देणार आहे.

नगरचे शिवसेनेचे मागील ४० वर्षांपासूनचे आधारवड असलेले माजी आमदार व उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याने जिल्हा सेनेला नायक नसल्याची म्हणजे निर्नायकी स्थिती निर्माण झाली आहे. पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाला पारनेर मतदार संघात असलेल्या नगर तालुक्यातील सेना नेत्यांची नापसंती आहे. दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वालाही मर्यादा आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील सेनेचे स्थान अबाधित राहण्यासाठी सेनेलाही अधिकृतपणे एका युवा नेत्याची गरज होती व त्याच वेळी मंत्री गडाखांनीही सेनेची राज्यात सत्ता येण्याच्या आधीच सेनेला पसंती दर्शवली असल्याने त्यांचे नेतृत्व शिवसैनिकांना आपलेसे वाटणार आहे. त्याचा फायदा गडाखांसह सेनेलाही होणार आहे. 

अर्थात जिल्ह्यातील सेनेच्या हक्काच्या विधानसभेच्या दोनच जागा मानल्या जात होत्या. नगर शहर व पारनेरमध्ये शिवसेनेचा डंका होता. पण या दोन्ही मतदार संघात आता राष्ट्रवादीचे प्राबल्य झाले आहे. अन्य मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात सेनेची ताकद आहे. पण सेनेचे नवे नेतृत्व झालेल्या मंत्री गडाखांना आता नगर व पारनेर या सेनेच्या बालेकिल्ल्यातील पक्षाची झालेली पडझड भरून काढण्याचे आव्हान असणार आहे. आता गडाख राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे घटक आहेत व तेथे शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस नेते मांडीला मांडी लावून राज्य कारभार एकत्रितपणे करीत आहेत. अशा स्थितीत नगर व पारनेरमध्ये मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला शह देत सेनेचे अस्तित्व पुन्हा दिमाखदार करण्याचे आव्हान गडाख कसे पेलतात, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

आधी कम्युनिस्ट, नंतर काँग्रेसचा व काही दिवसानंतर भगवा म्हणजे युतीमय झालेल्या जिल्ह्यातील काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या बहुतांश बड्या राजकीय घराण्यांनी बदलते राजकारण व काळाची पावले ओळखून शिवसेना-भाजपची साथ गरजेनुसार घेतली व गरज संपल्यावर सोडलीही. राधाकृष्ण विखे, मधुकरराव पिचड, अशोक काळे, शंकरराव कोल्हे, भानुदास मुरकुटे, बबनराव पाचपुते, अनुराधा नागवडे, मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, प्रसाद तनपुरे, शिवाजीराव कर्डिले, विजय औटी, नगरचे अरुण जगताप अशा काही बड्या नेत्यांनी कधीकाळी काँग्रेस संस्कृती सोडून सोयीनुसार सेना व भाजप अशी युती संस्कृती स्वीकारली. यापैकी काही पुन्हा स्वगृही परतले तर काहींनी पुन्हा युतीतील नवे घर आपलेसे केले. पण या नेत्यांच्या यादीत कधीही बाळासाहेब थोरात, यशवंतराव गडाख व नरेंद्र-चंद्रशेखर घुले बंधूंची नावे दिसली नाही. मात्र, यातील आता गडाखांचे नाव गळून पडले आहे. अशा स्थितीत अन्य दोन नावांच्या भविष्यातील राजकारणाबाबत आताच भाष्य करणे तसे धाडसाचे होईल.
शंकरराव गडाखांनी विधानसभा निवडणुकीत नेवाशात क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून आमदारकी जिंकली. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीनेही विरोधात उमेदवार उभा न करता साथ दिली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे राजकारण रंगात येण्याच्या आधीच त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून पाठिंबा दर्शविला. त्याचे फळ त्यांना पुढे सत्तेत सेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळण्यात मिळाले. त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला, त्याचवेळेस ते सेनेचे नेते झाले होते, आता त्यांनी अधिकृतपणे सेनेत प्रवेश करून सेना नेतेपदावर शिक्कामोर्तब करून घेतले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व वाढवण्याचे आव्हान त्यांना आता पेलावे लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post