खासदार विखेंनी केली अखेर नॅशनल हेल्थ मिशनकडे तक्रार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नॅशनल हेल्थ मिशनकडून कोविड उपचार सुविधांसाठी जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात नसल्याची तक्रार नगरचे भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी नॅशनल हेल्थ मिशन व केंद्रीय आरोग्य मंत्रालय अंतर्गत असलेल्या आरोग्य समितीकडे केली आहे. स्वतः खा. डॉ. विखे यांनी ही माहिती दिली. मिशन व समितीकडे तक्रार केल्यानंतर तेथे झालेली चर्चा व निर्णयाबाबत गोपनीयता शपथ घेतल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आता नॅशनल हेल्थ मिशनद्वारे त्यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई प्रतीक्षेत आहे.
डॉ. विखे म्हणाले, प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही. जनतेने ज्या हेतूने मला निवडून दिले, त्याला न्याय देऊ शकत नसल्याने हतबलता व्यक्त केली होती. जिल्हाधिकारी द्विवेदी व मी मित्र आहोत, आमच्यात संवादही आहे. डॉक्टर म्हणून माझ्याकडून सर्व जाणून घेतले जाते. पण होत काहीच नाही. त्यामुळे सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून त्यांना कोणी फोन करते काय, याची शंका वाटते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग करण्यासाठी 5 दिवस कडक लॉकडाऊनची मागणी होती. पण ती टाळली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत, रोज रुग्ण संख्या शेकड्याने वाढत आहे, असे डॉ. विखे म्हणाले. शिवाय मी जिल्ह्यात नव्हे तर केवळ नगर मनपा हद्दीत लॉकडाऊनची गरज व्यक्त केली होती. रोजगार, उद्योग व्यवसायावर लॉकडाऊनचा परिणाम होणार, हे खरे असले, तरी सध्याच्या काळात रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध व त्यांच्यावर उपचार गरजेचे आहेत. समाजात 90 टक्के लोक मास्क, सोशल डिस्टन्स, सिनिटायझेशन नियम पाळतात. पण 10 टक्के समाजकंटक नियम पाळत नाहीत व करोना पसरण्यास कारणीभूत होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सीबीआय चौकशीचे स्वागत
अभिनेता सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशी निर्णयाचे आ. राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी स्वागत केले. या प्रकरणातील सत्य आता बाहेर येईल, असा विश्वासही व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार यासाठी परवानगी देत नव्हते, त्यामुळे बिहार सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते व तेथून आता या चौकशीची परवानगी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या तपास क्षमतेवर आमचा आक्षेप नव्हता, तर या तपासावर सत्ताधाऱ्यांच्या असलेल्या दबावाबद्दल होता. मात्र, आता सीबीआय तपासात या प्रकरणाशी कोण्या मंत्र्यांचा संबंध आहे का, ज्या अभिनेत्रीचे नाव जोडले जाते, ती कोठे आहे, बेपत्ता आहे की नाहीशी झाली, बॉलिवूड-अंडरवर्ल्डचे काही संबंध आहे का, हे स्पष्ट होईल. आपली पाटी स्वच्छ असेल, आपण काही केले नसेल तर कोणाला भीती वाटण्याचे काही कारण नाही, अशी सूचक टिपणीही विखेंनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post