कोरोनामुळे यंदा मोहरम सवाऱ्यांची मिरवणूक काढू नये; यादे हुसैन आलम कमिटीचे आवाहन

संग्रहीत छायाचित्र

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
लखनौनंतर नगर शहरात साजरा होणारा मोहरम यंदा कोरोनाच्या सावटाखाली असल्याने मोहरम सवाऱ्यांची मिरवणूक यंदा काढली जाऊ नये तसेच विविध यंग पार्टीकडून मोहरम काळात होणारे भंडाऱ्याचे कार्यक्रमही गर्दी टाळण्यासाठी केले जाऊ नयेत, असे आवाहन यादे हुसैन आलम कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष अन्वर खान यांनी केले आहे.

यंदा २१ ऑगस्टला नगर शहरातील मोहरम उत्सवाला सुरुवात होत आहे. नगरचे मोहरम सुमारे ५५० वर्षांची जुनी परंपरा असलेले आहेत. लखनौनंतर नगर येथे मोठ्या प्रमाणात मोहरम होतो, असे सांगून खान म्हणाले, या उत्सवात कोठला हवेली येथील हजरत इमाम हसन व हजरत इमाम हुसैन यांच्या सवारी बसविल्या जातात. तसेच अहमदनगर शहर व मुकुंदनगर, भिंगार, केडगाव उपनगरातील विविध भागात सुमारे ८० सवार्‍यांचे पंजे बसविण्याची परंपरा आहे. या सवार्‍या मोहरमच्या ६ व्या, ७व्या, ८ व्या, ९ व्या तारखेला रात्री १२वाजता उठवून शहरातील विविध भागात या सवार्‍यांचे नवसकरी आपले नवस फेडत असतात. या सवार्‍यांच्या मिरवणुकीत महिला, पुरुष व आबालवृद्ध, तरुण सहभागी होतात. तसेच कोठला-हवेली येथील सवार्‍या मोहरमच्या ९ व्या तारखेला रात्री १२ वाजता उठवून शहरातील विविध मार्गांने मिरवणूक जाते. मोहरमच्या १० व्या तारखेला विसर्जन मिरवणूक निघण्याची परंपरा आहे. या संपूर्ण उत्सवात भाविक हजारोंच्या संख्येने एकत्र येत असतात. त्यामुळे यादे हुसैन आलम कमिटी च्यावतीने सर्व सवारींच्या व्यवस्थापक कमिटी, मुजावर यांना आवाहन करण्यात येत आहे की, यंदाचे वर्षी सवारीची स्थापना घराच्या आत करावी. येणाऱ्या भाविकांना सोशल डिस्टन्स ठेवून सवार्‍यांची कुठलीही मिरवणूक शहरातून काढू नये व भाविक रस्त्यावर एकत्र येणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन खान यांनी केले आहे.

तसेच महाप्रसाद-भंडारा कार्यक्रम रद्द करून त्या पैशात कोरोनाशी लढणार्‍या गरीब रुग्णांना आर्थिक मदत करून त्यांचा दुवा घ्यावा, असेही त्यांनी सुचवले आहे. यंदाच्या वर्षी मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post