टप्प्या टप्प्याने शैक्षणिक शुल्क घ्या; राष्ट्रवादीने सुरू केला शाळा-महाविद्यालयांकडे पाठपुरावा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाच्या संकट काळात शाळा-महाविद्यालये व खासगी क्लासेस यांनी शुल्क निश्‍चिती करून विद्यार्थ्यांकडून टप्प्या-टप्प्याने शुल्क मागणीबाबत धोरण ठरविण्याचे शासनाने स्पष्ट केले असल्याने त्याची अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने नगर जिल्ह्यात कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना तसे निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याध्यापक व प्राचार्यांशी याप्रश्‍नी चर्चा करून विद्यार्थ्यांकडून टप्प्याटप्प्याने शुल्क घेण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट, नगर तालुका अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, अक्षय भिंगारदिवे, गौरव नरवडे, जितेंद्र सरडे आदी सहभागी झाले होते.

आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक विभाग प्रमुख अ‍ॅड. चिन्मय गाढे, प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. शाळा-महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र, काही शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून अवाजवी शैक्षणिक शुल्क जबरदस्तीने वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत व काही संस्था पालकांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काही शाळा व विद्यालयांशी संपर्क केला असता त्यांच्याही काही अडचणी असल्याचे समोर आले आहे. मात्र, सर्वसामान्यांपुढे सध्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असल्याने त्यांना पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरण्यास अडचणी आहेत. या परिस्थितीमध्ये विद्यार्थी, पालक व शाळांचा समन्वय राहून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान राबवित असल्याचे जिल्हाध्यक्ष भांडवलकर यांनी सांगितले.

शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये, शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे, निश्‍चित केलेले शुल्क टप्प्या-टप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये, केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये अशा मागण्या शैक्षणिक संस्थांकडे करण्यात आल्या असून, त्यानुसार अंमलबजावणीसाठी पाठपुरावा सुरू राहणार असल्य़ाचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post