पाथर्डी-शेवगावमध्ये कुरघोडीचे राजकारण; कोरोना रुग्णांचा मात्र होणार फायदा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
शेवगाव-पाथर्डीच्या विद्यमान भाजपच्या आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. प्रताप ढाकणे यांच्यात कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. अर्थात त्यांच्या या राजकीय साठमारीने कोरोना रुग्णांना मात्र फायदा होणार आहे. पाथर्डी व शेवगावच्या उपजिल्हा रुग्णालयांत प्रत्येकी दीडशे बेड कोरोना बाधितांसाठी करण्यात येणार असल्याने कोरोनाबाधितांना आता नगर वा अन्यत्र उपचार घेण्यासाठी जाण्याऐवजी पाथर्डी वा शेवगावमध्येच उपचार मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून राजळे व ढाकणे या दोघांनाही धन्यवाद मिळणार आहेत.

पाथर्डी व शेवगाव शहरांतील उपजिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांसाठी जी पन्नास बेडची व्यवस्था आहे, तेथे एकशे पन्नास बेडची व्यवस्था करण्याचे आदेश आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकीकडे दिले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन पाथर्डी व शेवगाव या दोन्हीही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयात प्रत्येकी दीडशे बेडची व्यवस्था करण्याचे साकडे घातले व ही मागणी मंजूर करून घेतली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की आमदार राजळे यांनी पाथर्डी व शेवगाव येथील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेऊन या दोन्हीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळत असल्याने या दोन्हीही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयात प्रत्येकी दीडशे बेडची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर ढाकणे यांनी थेट मुंबई गाठून आरोग्यमंत्री टोपे यांची भेट घेतली व दोन्हीही तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने व दोन्हीही तालुक्यात बेडची व्यवस्था अपुरी असल्याचे त्यांना सांगितले व प्रत्येकी दीडशे बेडची व्यवस्था दोन्हीही तालुक्यात करण्याची मागणी केली. त्यानंतर मंत्री टोपे यांनी तातडीने नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दोन्हीही ठिकाणी दीडशे बेडची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. या भेटीत ढाकणे यांनी पाथर्डी व शेवगाव या दोन्हीही तालुक्यात रॅपिड टेस्टची संख्या वाढवावी, करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तातडीने विलगीकरण कक्षात वा सेंटरमध्ये ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्याची मागणीही टोपे यांच्याकडे केली. त्यानुसारही आवश्यक कार्यवाहीची ग्वाही टोपेंनी त्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राजळे व ढाकणे यांनी एकमेकांवरील कुरघोडीच्या राजकारणाच्या हेतूने का होईना पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शासकीय रुग्णालयांतील बेडची संख्या वाढवण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाबाधितांना दिलासा मिळणार आहे. लवकरात लवकर या दोन्ही तालुक्यांतील शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढण्याची प्रतीक्षा आता कोरोनाबाधितांना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post