मालकीच्या प्लॉटची परस्पर विक्री, गुरुजी हवालदिल; पारनेरचे रॅकेट चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
निवृत्त शिक्षकाच्या मालकीच्या प्लॉटची परस्पर विक्री केल्याने गुरुजी व त्यांचे कुटुंबिय हवालदिल झाले आहेत. पारनेर तालुक्यातील जमीन बळकावणाऱ्या रॅकेटने गुरुजींनाही झटका दिल्याने खळबळ उडाली आहे. गुरुजी तालुक्यात प्रसिद्ध असल्याने व त्यांच्या मालकीच्या प्लॉटची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता असल्याने आता हा प्रकार मिटवामिटवीचे प्रयत्न सुरू झाल्याचे सांगण्यात येते. पारनेर तालुक्यातील वजनदार राजकीय नेत्याशी संबंधितांनी गुरुजींचा डमी उभा करून त्यांच्या प्लॉटची विक्री करण्याचा हा उद्योग केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होतो की नाही तसेच मिटवामिटवी होऊन गुरुजींना त्यांचा प्लॉट परत मिळतो की नाही, याची उत्सुकता पारनेर तालुक्यातून व्यक्त होत आहे.

याबाबतची माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील हिंगणगाव येथील निवृत्त शिक्षकाचा पारनेर तालुक्यातीलच सुपे येथे सव्वा दोन गुंठ्याचा प्लॉट आहे. हा प्लॉट कामरगाव व सुप्यातील दोन एजंटांनी संगनमताने आपल्याच नात्यातील व्यक्तीच्या नावे केल्याची घटना घडली आहे. या शिक्षकाने २०१० मध्ये सुप्यात शहांजापूर रोडवर शासकीय दूध डेअरीजवळ हा प्लॉट खरेदी केला होता. त्यांना मुलगा नाही व दोन मुलीच आहेत. त्यांच्या पाठीमागे आधार नाही हे पाहून या दोन एजंटांनी तो प्लॉट आपल्याच घरातील व्यक्तीच्या नावावर घेण्याचा घाट घातला, त्यासाठी या शिक्षकांच्या नावाचा डमी उभा करून खरेदी करण्यात आली व ७/१२ वर नोंदीही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे याच दोघांनी नंतर या शिक्षकाच्या घरी जाऊन, आम्ही तुमचा सुप्याचा प्लॉट खरेदी केल्याचे सांगितले. ते ऐकून शिक्षक अवाकच झाले. मी प्लॉट विकलाच नाही तर तुम्ही तो कसा खरेदी केला, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. या शिक्षकाचा भाचा पारनेर पंचायत समितीमध्ये प्रमुख राजकीय पदावर आहे. गुरुजींच्या पाठीमागे राजकीय वजनदार व्यक्ती असल्याचे दिसू लागल्यावर जमिनींचे व्यवहार करणारांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी तो प्लॉट निवृत्त शिक्षकास परत देण्याची तयारी दाखवली. मात्र, मी प्लॉट विकलाच नाही तर परत घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. गुरुजींच्या या सडेतोड भूमिकेमुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहे. आता गुरुजींनी गुपचूप आपला प्लॉट परत घ्यावा म्हणून त्यांच्यावर परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती दबाव आणत असल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणात गुंतलेले लोक आता विविध मार्गाने गुरुजींना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील पाच-सहा दिवसापासून हा दबाव वाढत आहे. मात्र, तेच ते ऐकून गुरुजींना वैताग येत आहे. तरीही ते शांत आहेत. पण, त्यांची पत्नी व मुली दबावाखाली व मानसिक तणावाखाली आहेत. आमच्या कुटुंबाची शारीरिक वा मानसिक हानी झाल्यास त्यास सर्वस्वी कामरगावातील निवृत्त शिक्षक एजंट व सुप्यातील प्रसिद्ध एजंट जबाबदार असतील, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. कामरगावातील व सुप्यातील या एजंटांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली असून, महसूल विभागाला हाताशी धरून ज्याच्या मागे कोणी नाही, त्यांची संपत्ती बळकवण्याचे प्रकार चालवले आहेत, असे सुपे परिसरातील नागरिक बोलत आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही. येन केन प्रकारे जमीन खरेदी तर केली व नोंदही लावली, पण आता काय करायचे, अशी चिंता खरेदी घेणारे, देणारे, नोंदी करणारे, दस्त बनवणारे, साक्षीदार यांच्यासमोर आहे. अशा प्रकारे जमिनी खरेदी करणारे मोठे रॅकेट पारनेर परिसरात असून, ते शोधून काढणे गरजेचे आहे. प्रकरण मिटवण्यापेक्षा त्याचा छडा लावून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. 

या घटनेतील प्लॉट मालकाचा भाचा पारनेरच्या राजकारणात सक्रिय आहे व त्याचे तेथील राजकीय बड्या नेत्यांशीही संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा प्लॉट परत द्यायची घाई सुरू आहे तर आता गुरुजी याला तयार नाहीत. प्लॉट मी विकलाच नाही तर परत कसा घेऊ, असे त्यांचे म्हणणे आहे व तेथेच सर्वांची अडचण झाली आहे. खरेदी कॅन्सल करता येईना व नोंदीही पक्क्या झाल्या आहेत. त्यामुळे यात आता राजकीय दबाव वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर जमीन चोरांना एक्सपोज करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post