फसवणुकीचा प्रयत्न बेतला जीवावर.. पोलिसांनी उलगडले चौघांच्या खुनाचे रहस्य


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
स्वस्तात सोने देण्याच्या आमीषाने बोलावून घेतलेल्यांनी आरडाओरड करून पैशांची बॅग हिसकावली व त्याचवेळी हातातील मोबाईलही खेचल्याने त्याने चिडून समोर येईल त्याच्यावर चाकूचे सपासप वार सुरू केले...यात चौघांना जीव गमवावा लागला. स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न असा जीवघेणा ठरला. पाच दिवसांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर फाटा येथे घडलेल्या या रक्तरंजित घटनेचा उलगडा पोलिसांनी केला आहे. चौघांचे खून केल्याच्या प्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक केली आहे तर या लोकांची ३ लाखावरील रक्कम चोरून नेल्याबद्दल मृत चौघांसह त्यांच्या साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, कोपरगाव व नगर तालुक्यातील काही भागात स्वस्तात सोने देण्याच्या आमीषाने लुबाडणूक करण्याचे प्रकार नेहमी घडतात. पण लुबाडणूक झालेल्यांकडून प्रतिकाराची घटना सहसा घडत नाही. विसापूरच्या प्रकरणात मात्र पहिल्यांदा फसवणूक झालेल्यांकडून जीवघेणा पलटवार केला गेला. पोलिसांनी मात्र कौशल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले.

मागील २० ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता विसापूर फाटा येथे नातिक कुंज्या चव्हाण (वय ३५), श्रीधर कुंज्या चव्हाण (वय २०), नागेश कुंज्या चव्हाण (वय १७, तिघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदे) व लिंब्या हाबऱ्या काळे (वय २२, रा. देऊळगाव, ता. नगर) यांची धारदार हत्याराने छातीवर व पोटावर वार करून हत्या करण्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जुन्या वादाच्या कारणातून या हत्या झाल्याची फिर्याद आश्रदा कुंजीलाल चव्हाण (वय ६०) यांनी दिल्याने बेलवंडी पोलिसांनी अक्षय उंबऱ्या काळे व मिथुन उंबऱ्या काळे यांच्यासह त्यांच्या चार-पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, फिर्यादीतील माहिती व घडलेली घटना यात विसंगती दिसत असल्याने पोलिसांनी वेशांतर करून परिसरात चौकशी केली. त्यावेळी मृत चौघांसह त्यांच्या साथीदारांनी स्वस्तात सोने देतो म्हणून बोलावून घेतलेल्या जळगावच्या ग्राहकांनी हे हत्याकांड केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नगर पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधून आरोपी नरेश जगदीश सोनवणे, कल्पना किशोर सपकाळे, आशा जगदीश सोनवणे, प्रेमराज रमेश पाटील व योगेश मोहन ठाकूर (सर्व रा. जळगाव) या पाचजणांना अटक केली. तसेच यातील कल्पना सपकाळे यांच्या फिर्यादीवरून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ३ लाख १५ हजाराचा माल लुटल्याबद्दल मृत चौघांसह त्यांच्या साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील व कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.

ते पैसे मिळाल्याने बसला विश्वास

जळगावच्या लोकांना ४ लाख रुपयात पाव किलो सोने देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. १५-२० दिवसांपूर्वी नमुन्यादाखल सोन्याचे क्वॉइन देण्यात आले होते व अशा प्रकारचे सोने आमच्याकडे असल्याचे सांगण्यात आले होते. जळगावकरांनी ते मोडल्यावर त्याचे पैसे आल्याने स्वस्तात सोने घेण्याची त्यांची आशा बळावली. मात्र, जळगावमधील काहीजणांनी त्यांना फसवणूक होऊ शकते, असे म्हणून सावध केले होते. त्यामुळे स्वसंरक्षणाच्या उद्देशाने ते आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. जळगावची ही मंडळी शेतमजूर व इलेक्ट्रीक व्यवसाय करणारी आहेत, पण स्वस्तातील सोन्याचा मोह त्यांनाही आवरला नाही व तो त्यांच्याही अंगलट आल्याचे या प्रकरणात घडलेल्या घटनांतून स्पष्ट झाले आहे.

'देऊन टाका... देऊन टाका' ओरडताच झाला हल्ला
पोलिसांनी जळगावच्या आरोपींना अटक केल्यावर घडलेल्या घटनेचा उलगडा झाला. या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता स्वस्तात सोने खरेदीसाठी जळगावहून दोन महिलांसह आलेल्या पाचजणांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क केल्यावर त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात बोलावून घेतले गेले. मृत चौघांसह अन्य साथीदारांनी कल्पना सपकाळे यांच्याकडून २ लाख ९५ हजार रुपये मोजून घेतले व मृतांनी 'देऊन टाका...देऊन टाका' असा मोठ्याने आवाज केल्यावर त्या शेतात आजूबाजूला दबा धरून बसलेले काहीजण धावत तेथे आले व त्यांनी सपकाळेंसह त्यांच्यासमवेतच्या लोकांवर हल्ला करून त्यांच्याजवळील मोबाईल, पर्स व गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत जळगावच्या नरेश सोनवणे याने त्याच्याकडील चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार करणे सुरू केल्याने चौघांचा त्यात मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणात मृत झालेल्या चौघांपैकी नागेश चव्हाण वगळता अन्य तिघांविरुद्ध ड्रॉपचे (स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून लुबाडणूक करण्याचे) ११ गुन्हे दाखल आहेत.

जुन्या वाड्यात सापडले वा कोठे खोदकामात सापडल्याची बतावणी करून स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवणे व ते घेण्यास आलेल्यांचे पैसे लुबाडून व त्यांना मारहाण करून पिटाळून लावण्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडलेल्या आहेत. मात्र, यात फसवणूक झालेले अपवादाने पोलिसांमध्ये तक्रार देतात. फसवणूक व मारहाण झाल्याने बदनामी टाळण्यासाठी म्हणा वा स्वस्तात सोने घेण्यासाठी पैसे कोठून आणले याची चौकशी पोलिसांकडून होण्याच्या भीतीने म्हणा, तक्रारी देण्याचे अनेकजण टाळतात. त्यामुळे असे ड्रॉपचे गुन्हे घडत असतात. विसापूरच्या प्रकरणात फसवणुकीचा प्रयत्न करणारांनाच जीव गमवावा लागल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. पोलिसांनी आता या प्रकरणात दाखल दोन्ही फिर्यादींचा तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post