अहमदनगर : एलसीबी कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी; गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी रवींद्र कार्डिले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदाराच्या नगरमधील मोटर सायकल दुरुस्ती दुकानावर पत्ते खेळण्यावरून क्लबची केस न करण्यासाठी तसेच फिर्यादीच्या वडिलांवर झालेल्या केसमध्ये फिर्यादीला आरोपी न करण्यासाठी पंचासमक्ष तक्रारदारांकड़े २० हजाराची लाच मागण्यात आली होती. तसा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, सुनील गिते यांनी ही कारवाई केली. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने त्यांच्या कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

(संपर्क - अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक. दुरध्वनी क्रं. 0253-2578230. टोल फ्रि क्रमांक 1064)

Post a Comment

Previous Post Next Post