महिलाही करतात पुरुषांचा छळ; पुरुष हक्क संरक्षण समिती देते आधार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : समाजात पुरुषांकडून महिलांचा छळ होत असल्याच्या घटना नेहमी घडतात, यातून पोलिसात गुन्हेही दाखल होतात. पण नाण्याच्या या एका बाजूला दुसरीही बाजू असून, काही महिला पुरुषांची छळवणूक करतात, असा दावा पुरुष हक्क संरक्षण समितीचा आहे. त्यामुळे अशा महिलांकडून पिडित झालेल्या पुरुषांना मदत करण्याचे व महिलांनी केलेल्या अन्यायात आधार देण्याचे काम पुरुष हक्क संरक्षण समिती करीत आहे. राज्यातील ३० जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या समितीची वाटचाल आता रौप्य महोत्सवाकडे सुरू आहे. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पुरुष हक्क संरक्षण समितीच्या अधिवेशनात नगरच्या जिल्हाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे अॅड. शिवाजी अण्णा कराळे यांची निवड झाली आहे. ते मागील २० वर्षांपासून जिल्ह्यातील पिडीत पुरुषांना न्याय देण्याचे काम करीत आहेत.

महिलांना संरक्षण मिळावे म्हणून अनेक कायदे निर्माण केले आहेत, तसे कायदे पुरुषांना संरक्षण मिळावे म्हणून तयार केले नाहीत, असे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक महिला सासु-सासरे आणि नवरा व त्यांचे नातेवाईक यांच्याविरुध्द पोटगीच्या केसेस, हुंडाबळीच्या केसेस, घरगुती छळ केला अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतात, यापैकी अनेक गुन्हे खोटे असतात व त्याचा विनाकारण त्रास सासरच्या मंडळींना होता. तसेच काही महिला विनाकारण पुरुषांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ब्लॅकमेलसुद्धा करतात. अशा परिस्थितीत पोलिस प्रशासन सुद्धा पुरुष मंडळींना सहकार्य करीत नाहीत. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन 1996 मध्ये नाशिक येथे पुरुष हक्क संरक्षण समितीची स्थापना झाली आणि कायदेशीर त्याचे रजिस्ट्रेशन केले गेले. सध्या महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यात संस्था कार्यरत असून आतापर्यंत संघटनेची 22 राज्यस्तरीय अधिवेशने झाली आहेत. अनेक पत्नी पिडीत पुरुषांना समितीने कायदेविषयक मदत केली आहे. एवढेच नाही तर ज्या महिला भगिनींना पुरुषांनी विनाकारण त्रास दिला, त्यांनासुध्दा मदत केली आणि कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून प्रयत्न केले आहेत, असे समितीचे म्हणणे आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्यां शनिवारी पत्नी पिडीत पुरुषांना कायदेविषयक मार्गदर्शन समितीच्यावतीने केले जात आहे.

नाशिक येथे पुरुष हक्क संरक्षण समितीच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत पुरुष हक्क समितीच्या यापूर्वी झालेल्या 22 राज्यस्तरीय अधिवेशनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील घाडगे आणि सचिव ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांनी नगरच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. शिवाजी अण्णा कराळे यांची फेरनिवड केली. लवकरच नोव्हेंबर 2020 मध्ये समितीचे 23 वे अधिवेशन सोलापूर येथे घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले. पुरुष हक्क समितीला प्रसिद्ध प्रवचनकार ॲड. (कै.)अपर्णाताई रामतीर्थकर यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पुरुष हक्क संरक्षण समिती पुरुषांच्याबरोबरच स्रियांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लढते व कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून काम करते, असेही यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post