'समृद्धी'ची समृद्धी उठली जीवावर? नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडून बेदखल?


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : राज्यातील मागील भाजप सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हसनाबाद-तळेगाव दिघे परिसरातील नागरिकांच्या जीवावर उठले की काय, अशी स्थिती दिसू लागली आहे. 

समृद्धी महामार्गासाठी हसनाबाद-तळेगाव दिघे परिसरातील दगड खाणीतील दगड उत्खननाचा व खडी क्रशरचा होणारा आवाज, धूळ व विषारी वायूचे प्रदूषण, स्फोटामुळे परिसरातील घरांना गेलेले तडे, स्फोटातून उडणारे दगड घरांच्या अंगणात येऊन पडण्याच्या प्रकाराने या गावातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करूनही त्यांची कोणीही दखल घेतली जात नसल्याचे सांगितले जाते. राज्यातील नव्या महाविकास आघाडी सरकारचे आधारस्तंभ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या जीवाला महामार्गाच्या कामामुळे निर्माण झालेला धोका व त्यांच्या तक्रारींची प्रशासनाकडून घेतली जात नसलेली दखल या भागातील रहिवाशांना निराश करून गेली आहे. त्यामुळे या दगड खाणीपासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम संगमनेर तालुक्यातील धोत्रे ते देर्डे कोऱ्हाळे या गावांदरम्यान २९ किलोमीटरचे होणार असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी लागणारे दगड व खडीसाठी हसनाबाद-तळेगाव दिघे परिसरातील दगड खाणीतून उत्खनन केले जाते. या खाणीतून स्फोटके लावून दगड फोडले जातात व त्यांच्या आवाजाच्या दणदणाटाने परिसरातील जगताप वस्ती, वामनवाडी व भागवतवाडी परिसरातील घरांना तडे गेल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागात बहुतांश मागासवर्गीय नागरिकांची वस्ती असल्याने त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, असेही बोलले जाते. खाणीत स्फोट केल्याने उडालेले दगड घरांच्या अंगणात पडतात, यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खाणीत स्फोटकांमुळे उडणारी धूळ तसेच विषारी वायूमुळे लहान मुले व वयोवृद्धांना श्वसनाचे विकार जडू शकतात, या धूळ व धुरामुळे परिसरातील पिकांचे नुकसान झाले आहे, स्फोटकांच्या हादऱ्याने घरांना तडे गेले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या दगड खाणीसाठी ग्रामसभेची परवानगी घेतली गेली नाही व ती बेकायदेशीर असल्याचे तसेच ती नागरी वस्तीजवळ असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासन यंत्रणेकडे मागील तीन महिन्यांपासून केलेल्या तक्रारींची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही, असेही परिसरातील रहिवाशांकडून सांगितले जाते. महसूल मंत्री थोरात यांनी या रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेण्याची मागणीही केली गेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post