..तर, राठोडांनीच नगरला वाचवले असते; सुवर्णकार संघटनेच्या मुथांचा दावा, १४ दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
आज अनिलभैय्या राठोड असले असते तर त्यांनीच मुख्यमंत्र्यांना साकडे घालून नगरला जनता कर्फ्यू लावला असता व नगरला वाचवले असते, असा दावा व्यापारी नेते सराफ सुवर्णकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि जैन समाजाचे प्रमुख सुभाष मुथा यांनी केला आहे. कोरोनाच्या बळींची संख्या शहरात २३० झाली असल्याने शहराची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी कोरोनाची साखळी मोडण्यासाठी १४ दिवसांचा लॉकडाऊन-जनता कर्फ्यू जारी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नगरचे आमदार,खासदार आणि सर्व पक्षांच्या प्रमुखांनी शहरातील परिस्थितीचा विचार करून या विषयात लक्ष घालावे. हा राजकारणाचा विषय नाही. व्यापार,व्यवहार,व्यवसायापेक्षाही आज लोकांचे जीव सर्वात महत्वाचे असून व्यापार होत राहील. कामधंदे पुन्हा सुरू होतील. मात्र, एकदा गेलेला जीव पुन्हा परत येत नाही. त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी राजकारण दूर ठेवून या विषयावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आपण अनेक व्यापारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. तसेच गेले १४ दिवस मनपा युनियनचे घरातून काम सुरू आहे. नागरिकांना मनपामध्ये प्रवेश नाही. कर्मचाऱ्यांसह सर्वांची म्हणजे जनतेचीही सुरक्षा अर्थात जीव महत्वाचे आहेत, असे प्रशासनाला वाटत नाही का? असा सवाल करून मुथा म्हणाले, आज अनिलभैय्या असते तर त्यांनीच मुख्यमंत्र्यांना साकडे घालून नगरला जनता कर्फ्यू लावला असता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व नेत्यांनी साकडे घालावे. लोकांचे जीव वाचवण्याचा एकमात्र उपाय म्हणून जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

जिल्ह्यात १२ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला. प्रारंभी लॉकडाऊनमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती. बाहेरून-परगावहून येणााऱ्या रुग्णांचे प्रमाण दिसून येत होते. मात्र, लॉकडाउन उठल्यानंतर बाहेरून येणारांचे प्रमाण वाढले. स्थानिक पातळीवर संसर्ग वाढला. मार्चमध्ये ८, एप्रिल ४७, मे १४७, जून ४६५ तर जुलै महिन्यात ४९७३ इतकी म्हणजेच दहापट तर या ऑगस्टच्या २३ दिवसात १७०७४ रुग्ण आढळले. आजपर्यंत २३१ रुग्ण मृत झाले. हा फक्त अधिकृत आकडा आहे. काही नोंदच नसणारे घरी वा खासगी दवाखान्यांतील मृतांची नक्की संख्या खासदार पण सांगू शकले नाहीत. बरे झालेल्या रुग्णांबाबत योग्य माहिती मिळत नाही. फक्त ऑगस्ट महिन्यात १६३रुग्णांनी जीव गमावले. यातून रुग्ण संख्या आणि मृत्यू रोखण्याचे संकट स्पष्ट होत असताना केवळ काही लोक आणि नेत्यांची नाराजी नको यासाठी जर सरकार कठोर उपाय करण्याचे टाळत असेल तर देवपण नगरकरांचे रक्षण करू शकणार नाही, अशी खंतही मुथा यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post