पावणे तीन कोटी परस्पर वळवले; शहर बँकेच्या संचालकांसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगरमधील प्रसिद्ध शहर सहकारी बँकेने कर्जदाराची परवानगी नसताना त्याच्या कर्जखात्यातून सुमारे पावणे तीन कोटीची रक्कम परस्पर अन्य खात्यांतून वर्ग केल्याबद्दल कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा व उपाध्यक्ष प्रा. सुजित बेडेकर यांच्यासह संचालक मंडळ सदस्य तसेच बँकेचे संबंधित शाखाधिकारी, कॅशियर, चेक पास करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.

नगरमधील बाबूलाल बच्छावत यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांची माणक एन्टरप्रायजेस ही फर्म असून, खाद्यपदार्थांच्या होलसेल व रिटेल विक्रीचा व्यवसाय ते करतात. व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी १७ जानेवारी २०१९ रोजी शहर सहकारी बँकेच्या झेंडीगेट शाखेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. २४ जानेवारी १९ला त्यांना ३ कोटीचे कर्ज मंजूर झाले. यापैकी २ कोटी ३० लाख कॅश क्रेडीट व ७० लाखाचे टर्मलोन होते. या कर्जासाठी त्यांच्याकडून १० कोरे चेक (धनादेश) सिक्युरिटी म्हणून घेण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे जून २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्या कर्जखात्याची तपासणी केल्य़ावर १६ जुलै २०१९ रोजी बिकाजी फूडस इंटरनॅशनल या फर्मला आरटीजीएसद्वारे २६ लाख ४५ हजार रुपये पाठवल्याची नोंद वगळता ८ विविध फर्मला बच्छावत यांच्या परवानगीविना त्यांच्या कर्जखात्यातून पैसे वर्ग केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांना समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी वकिलामार्फत नोटिस पाठवली. पण त्यातूनही समाधानकारक खुलासा केला गेला नाही तसेच त्यांचे पैसे पुन्हा त्यांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यास नकार दिला गेला. आरएमसी मार्केटिंग, बिकाजी फूडस इंटरनॅशनल, मनपसंत बेव्हरेज, एजीई इंडिया, आरएमसी मार्केटिंग, बिकाजी फूडस डेअरी, दीपक डेअरी अशा विविध फर्मच्या खात्यात आपल्या परवानगीविना पैसे वर्ग केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच खात्यातून ३ लाख रुपये रोख काढले गेल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांची परवानगी न घेता एकूण २ कोटी ७३ लाख ५५ हजार रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे व ही अफरातफर असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ज्यांच्या खात्यात पैसे वर्ग झाले, त्यांची बनावट खाती बँकेच्या मुख्य शाखेत उघडण्यात आली असून, ती कोणी उघडली, याची माहिती बँकेद्वारे दिली जात नाही तसेच ३१ मार्च रोजी रविवार असताना या रकमा या विविध खात्यांतून वर्ग झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post