'फरसाण'ने घडवली मामा-भाच्यात हाणामारी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : शेव-चिवड्याची फरसाण खरे तर अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ. पण त्यावरून हाणामारी होण्याची घटना नवलाचीच म्हणावी लागेल. फरसाणचा भाव कमी का केला, यावरून श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथे एकावर चाकूचे वार केले गेले. मामा-भाच्यांच्या दारू पार्टीत फरसाणचा आस्वाद घेत एकमेकांशी झालेली मारामारी श्रीगोंदे तालुक्यात चर्चेत आहे.

श्रीगोंदे पोलिसात मंगेश केदारी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. मामा कानिफनाथ गांगर्डे व रमेश गांगर्डे यांच्यासमवेत दुकानात फरसाण घेण्यासाठी गेले असताना मंगेश केदारी यांनी दुकानदाराला फरसाणचा भाव १० रुपयाने कमी घेण्यास सांगितले. त्यावरून मामा कानिफनाथला राग आला व फरसाणचा भाव कमी करून माझी इज्जत घालवतो का, असे म्हणत त्याने मंगेशला शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही मामा व भाचा दारू पार्टीला बसल्यावर फरसाणचा भाव कमी करण्याच्या विषयावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाले व मामा कानिफनाथने बांबूने मंगेशला मारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मंगेशने तो बांबू हिसकावून कानिफनाथला मारला व ते पाहून दुसरा मामा रमेश गांगर्डे याने मंगेशवर चाकूचे वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. फरसाणवरून घडलेली ही हाणामारी जोरदार चर्चेत मात्र आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post