नगरमध्येही झाले राम मंदिराचे भूमिपूजन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
अयोध्येतील प्रसिद्ध श्रीराम मंदिराचे भूमिपूजन बुधवारी दुपारी धुमधडाक्यात होत असताना व देशभर त्याचा जल्लोष होत असताना याच वेळी नगरपासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखर्डी गावातही श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. अर्थात अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनासारखा थाटमाट या पोखर्डीच्या भूमिपूजनात नव्हता. पण कोरोनाच्या काळात गर्दी न करता व सोशल डिस्टन्सिंग पाळत अवघ्या चार-पाचजणांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन झाले व येत्या राम नवमीला या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्पही सोडला गेला.

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी-पोखर्डी गाव प्रसिद्ध आहे. नगरपासून ५-६ किलोमीटर अंतरावरील पोखर्डी गावातील पिंपळगाव उज्जैनी रस्त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भाजपचे कार्यकर्ते अंतु वारुळे यांची श्रीरामनगर वसाहत आहे. य़ा वसाहतीतील दोन गुंठे जागेत यांनी श्रीराम-लक्ष्मण-जानकी मंदिर बांधण्याचे ठरवले आहे. या मंदिराच्या बांधकामाचा मुहूर्त अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाआधी १५ मिनिटांचा ठरवला. बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास या मंदिराचे भूमिपूजन झाले व त्यानंतर अयोध्येतील भूमिपूजन सोहळा टीव्हीवर पाहण्याचा आनंद वारुळे परिवाराने घेतला. त्यांचे पोखर्डीतील राम मंदिर १० बाय १० फूट लांबी-रुंदी व ३० फूट उंचीचे आहे. मंदिरातील राम-लक्ष्मण व जानकी मूर्ती जयपूरहून ते आणणार आहेत. पण अयोध्येतील मंदिराच्या भूमिपूजन मुहूर्तावरच त्यांनी आपल्या वसाहतीतील छोटेखानी राम मंदिराचे केलेले भूमिपूजन सोशल मिडियात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करून गेले.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post