जिल्हा विभाजनासाठी श्रीरामपूरकरांचे महसूल मंत्री थोरातांना साकडे


एएमसी मिरर वेब टीम

अहमदनगर : नगर जिल्ह्याचे विभाजन करून नवा श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूरकरांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना साकडे घातले आहे. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी थोरातांनी प्रतिष्ठा पणाला लावावी, अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.

देवळाली प्रवरा येथे शेतकरी पुतळ्याजवळ क्रांती दिनानिमित्त ९ ते १५ ऑगस्टदरम्यान श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली प्रवरा तालुका जनजागृती सप्ताह अभियान करण्यात आले. यावेळी ५० वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या मागणीची व या सामाजिक प्रश्नाची सोडवणूक तात्काळ होण्याची मागणी करण्यात आली.  यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण यांच्यासह डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र शिंदे, राजेंद्र लांडगे, नगरसेवक तुषार शेटे, श्रीकांत कदम, बाळासाहेब मुसमाडे, राजेंद्र कोळसे, गीताराम शेटे, एस.एस. झावरे, प्रवीण देशमुख, भाऊसाहेब चव्हाण, प्रवीण औटी, विलास चव्हाण, गोविंद टिक्कल, वैभव कोळसे आदींनी अभिवादन केले. यावेळी चव्हाण यांनी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे मनोबल वाढवले व आम्ही सदैव बरोबर असल्याचे सांगून समिती करीत असलेल्या कार्याचे कौतुकही केले.

कमी खर्च येणार असल्याचा दावा
सर्वात मोठा व ५० लाखापर्यंतची लोकसंख्या अशी नगर जिल्ह्याची ओळख आहे. कोरोना प्रादूर्भावात मौलिक कामगिरी बजावण्यासाठी प्रशासन मोठी कसरत करीत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनुभवी आणि ज्येष्ठ महसूल मंत्री म्हणून दुसऱ्यांदा बाळासाहेब थोरातांच्या रुपाने अभ्यासू व्यक्तिमत्व लाभले आहे. २०१४ मध्येही थोरात महसूल मंत्री होते. त्यांनी त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा केला. थोरातांनी नगर जिल्ह्याचे पालकत्वही स्वीकारले आहे. ते याच जिल्ह्यातील असून तेच जिल्हा विभाजन प्रश्न मार्गी लावतील, अशी भूमिका ग्रामविकास व नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही स्पष्ट केली. त्यामुळे महसुल मंत्री थोरातांसह पालकमंत्री मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींकडून जिल्हा विभाजन अपेक्षापूर्तीच्या भावना व्यक्त करीत असल्याचे यावेळी लांडगे यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा विभाजनासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता सर्वात कमी खर्च श्रीरामपूर जिल्ह्यासाठी येणार आहे, असा दावाही त्यांनी केला. सध्याच्या निकषाच्या आधारे बहुतांशी सरकारी कार्यालये श्रीरामपुरात कार्यान्वित आहे व उर्वरित कार्यालयांसाठी मुबलक जागाही आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी अवघ्या आठ-दहा लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांना स्वतंत्र जिल्हाधिकारी आहे. मात्र, नगर जिल्ह्याची लोकसंख्या ५० लाख असतानाही एकच जिल्हाधिकारी आहे. हा अन्याय सातत्याने जिल्हावासीयांवर होत आहे, असे म्हणणे कृती समितीचे संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव भोसले आणि कार्याध्यक्ष बाबासाहेब औताडेंनी मांडले आहे व श्रीरामपूर जिल्हा लवकरच होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे. तसेच जिल्हा विभाजन झाल्यास दक्षिणेसह उत्तर जिल्ह्यासाठी स्वतंत्र निधी मिळेल. त्याच बरोबर अनेक कल्याणकारी योजना प्रशासकीय यंत्रणेला सहजतेने राबविता येतील. नवीन उद्योग धंदे वाढतील. सर्व सामान्यांची क्रयशक्ती वाढून शासनालासुध्दा महसूल मिळेल असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post