वाहतूक पोलिसांनो, मनपाला सिग्नल जीर्णोद्धार निधी द्या हो; जागरूक नागरिक मंचाची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाच्या काळात सर्व उद्योग-व्यवसाय अडचणीत आले असले तरी पोलिसांच्या वाहतूक शाखेने दीड कोटीची विक्रमी वसुलीची केलेली कामगिरी अभिनंदनीय आहे. त्यामुळे या पैशांतून नगरच्या महापालिकेला २५ लाखाचे सिग्नल जीर्णोद्धार निधीच्या रुपात दान द्यावे, अशी मागणी येथील जागरूक नागरिक मंचाने केली आहे. तसे पत्र मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी गृहमंत्र्यांसह पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त व वाहतूक पोलिस निरीक्षकांना पाठवले आहे.

२०२० हे वर्ष जरी अपशकुनी करोना घेऊन आले असले आणि सगळ्या जगाला सगळे उद्योग बंद करून मंदीच्या खाईत लोटणारे ठरले असले तरी, गेल्या आठ महिन्यांमध्ये नगर जिल्ह्याच्या वाहतूक शाखेने मात्र दीड कोटीसारखी मोठी रक्कम दंड स्वरूपामध्ये वसूल केल्याचा विक्रम केला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २० या आठ महिन्यामध्ये वाहतूक शाखेने वाहनचालकांकडून दंड स्वरुपामध्ये ही रक्कम वसुल केली आहे. बाकी सगळे तोट्यात असले तरी ही फायद्याची गोष्ट आहे व समाजामध्ये जसे सधन व्यक्ती दुर्बलांना दानशूरपणे मदत करताना दिसतात तसे वाहतूक शाखेने करोनाची मदत म्हणून नगर महापालिकेला उपकृत करण्याची विनंती मुळे यांनी केली आहे. महापालिकेच्या तिजोरीत कायम वाहतूक विकास कामांसाठी वा सिग्नल दुरुस्तीसाठी खडखडाट असतो व जी कायम दारिद्र्यरेषेखाली असते, अशा पिवळ्या रेशन कार्डवाल्या महापालिकेला या दीड कोटी रुपयांमधून २५ लाख रुपये पोलिस खात्याकडून सिग्नल जीर्णोद्धार निधी म्हणून दान देण्यात यावे व ते पैसे नगर शहरांमध्ये बोटावर मोजण्यासारखे जे दहा सिग्नल वर्षानुवर्षे बंद आहेत, ते अपटूडेट चालू करण्यासाठी खर्च करावेत व यातून महाराष्ट्राला एक नवीन आदर्श घालून द्यावा, अशी विनंतीही मुळे यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे.

शिवाय या रकमेतून सिग्नल दुरुस्तीची कामे झाली तरी नगरकरांकडून सिग्नल तोडण्याच्या कारणास्तव दंड वसुली पोलिसांना होतच राहणार आहे. यातून भविष्यात वाहतूक शाखेच्या उत्पन्नात अजून भर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे वाहतूक शाखेची ही गुंतवणूक वायाही जाणार नाही तसेच देशभरामध्ये एका शासकीय डिपार्टमेंटला दुसऱ्या डिपार्टमेंटने शेजारधर्म म्हणून पैशांची अशी मदत केल्याचा अभुतपूर्व नवीन आदर्श यातून निर्माण होईल, अशी टिपणीही मुळेंनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post