सरकारला धडा शिकवण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये आहे : राजू शेट्टी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : राज्यात लॉकडाऊन असताना मंत्र्यांच्या दालनांच्या दुरुस्तीसाठी व मंत्र्यांना गाड्या घेण्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला गेला. पण दूध उत्पादकांना देण्यासाठी १५० कोटी दिले जात नाहीत. पण हे जर असेल सुरू राहिले तर एक दिवस दूध उत्पादक शेतकरी तुम्हाला तुडवून मारतील, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, असा सूचक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला. राज्यात कोणत्याही आघाडीचे वा पक्षाचे सरकार असो, त्याला घुडघे टेकायला लावण्याची ताकद दूध उत्पादकांमध्ये आहे व ती याआधीही आम्ही दाखवली आहे. आता संधी द्यायची म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. पण ही पोकळ धमकी समजू नये. सरकारला अडचणीत आणून धडा शिकवण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात लिटरमागे प्रत्येकी ५ रुपये जमा केले जावेत तसेच दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द केला जावा, या मागण्यांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेण्यात आला. कोरोना-कोविड नियम धुडकावून गर्दी जमवत हा मोर्चा काढला गेला. अशाच पद्धतीचे मोर्चे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणार असून येत्या २७ रोजी बारामतीमध्ये मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी एका झेंड्याखाली एकत्र आले व रस्त्यावर उतरले तर त्यांचा बाप (केंद्र व राज्यातील सत्ताधारी) दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करतील, असा दावा करून शेट्टी म्हणाले, कृषी उत्पादनांना जीएसटीतून सूट आहे, पण दही, तूप, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांवर ७ ते १८ टक्के जीएसटी आकारला जातो. व्यापारी-कारखानदारांप्रमाणे शेतकऱ्यांना जीएसटीचा परतावाही मिळत नाही. तसेच सध्या दुधाला व दुग्धजन्य पदार्थांना मागणीही कमी आहे. कारण, कोविड लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक अडचणीत आहे. अशा काळात दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द झाला तर दुग्धजन्य पदार्थांचे भाव कमी होतील व जनतेकडून त्याची मागणीही वाढेल, असा दावाही त्यांनी केला.

राज्य सरकारने १५० कोटी रुपये दूध उत्पादकांना दिले तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करण्यासह अन्य मागण्या कशा मंजूर करून घ्यायच्या, याचे आमचे आम्ही पाहू,असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, मोर्चाआधी बोलताना त्यांनी अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर टीका केली. तो चांगला अभिनेता होता, पण त्याच्या आत्महत्येएवढी चर्चा दूध व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर तसेच सामान्यांच्या जगण्यावर होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्याकडे डोळेझाक केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post