स्वच्छ सर्वेक्षण : नगरची देशात 40 व्या क्रमांकावर झेप; राज्यात 12 व्या स्थानी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत कचरा मुक्त शहरांमध्ये थ्री स्टार मानांकन मिळविल्यानंतर नगर महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मागील वर्षी सर्वेक्षणात पिछेहाट झाल्यानंतर एक ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या तुलनेत नगर शहराने आता देशात 40 व्या क्रमांवर झेप घेतली आहे. तर राज्यात 12 व्या क्रमांकावर आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणासाठी महापालिकेने मोठी तयारी केली होती. घर ते घर कचरा संकलन व कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी महापालिकेकडून करण्यात आली. शहर स्वच्छतेच्या उपाययोजनांसाठी महापौरांसह सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी, आयुक्तांसह सर्व कर्मचारी दिवस-रात्र झटत होते. नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती, कर्मचार्‍यांकडून दिवसा व रात्री दोन वेळा झालेली साफसफाई व कचराकुंडी मुक्त शहर करण्यात आल्यामुळे नगर शहराला ‘थ्री स्टार रँकींग मिळाले. त्या पाठोपाठ सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, सेप्टिक टँकमधून उपसण्यात आलेल्या मैल्याची विल्हेवाट लावण्यासाठी एफएसटीपी प्रकल्प अवघ्या दोन महिन्यात उभारण्यात आला. त्यामुळे शहराला ‘ओडीएफ++’चा दर्जा मिळाला.

नागरिकांच्या प्रतिक्रिया व प्रत्यक्ष तपासणीतही शहराला चांगले गुण मिळाले आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्म प्रतिक्रियांमुळे गुणांकनात वाढ झाली. एकूण 6000 हजार गुणांपैकी नगर शहराला 4148 गुण मिळाले असून, देशात 40 वा क्रमांक मिळाला आहे. तर राज्यात नगर शहर 12 व्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नगर शहराची मोठी पिछेहाट झाली होती. राज्यातही नगर शहराचा सर्वात शेवटचा क्रमांक होता. यंदा झालेल्या सर्वेक्षणात शहर पहिल्या 50 मध्येच आले पाहिजे, यादृष्टीने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त सुनील पवार, प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यासह सर्व अधिकारी, विभागप्रमुख, प्रभाग अधिकारी व स्वच्छता कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. नगरकरांनीही त्याला सकारात्मक साथ दिल्यामुळे देशात 40 व्या क्रमांकावर झेप घेऊन नगरने नवा इतिहास घडविला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सर्व नगरकरांचे आभार मानले आहेत. तसेच स्वच्छतेसाठी प्रयत्न करणारे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सर्व स्वयंसेवी संस्थांचे अभिनंदन केेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post