फळझाडांच्या रोपांचे दान.. सहा महिन्यांनी करणार संगोपनाची तपासणी


एएमसी मिरर वेब
अहमदनगर :
वृक्षारोपणाचे हजारो कार्यक्रम दरवर्षी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांकडून होतात. त्याचे दिमाखदार फोटो सोशल मिडिया व प्रसिद्धी माध्यमांतून जगभर जातात. पण ही लावलेली झाडे पुढे जगली की नाही, याची पाहणी कोणीही करीत नाहीत. या पार्श्वभूमीवर येथील वृक्षप्रेमीने उद्योजक दीपक चांदोरकर यांनी अभिनव संकल्पना राबवताना २०० फळझाडांची रोपे मित्रमंडळी व नातेवाईकांना भेट दिली, पण ती देताना या फळझाडांचे संगोपन नीट होते की नाही, याची सहा महिन्यांची तपासणी करणार, अशी प्रेमळ ताकीदही दिली. अर्थात फळझाडाचे दान मिळालेल्यांनीही त्यांचे रोपण करून आवश्यक ते संगोपन करण्याची ग्वाहीही आवर्जून दिली.

एमआयडीसीतील अ‍ॅलविन कॅरमल कलर्स (इंडिया) या कंपनीचे संचालक दीपक चांदोरकर यांनी पर्यावरणाचा रक्षणाच्या चळवळीत सहभाग असावा म्हणून मागील दीड वर्षांपासून विविध फळ झाडांची नर्सरी घरी विकसित केली आहे. ती सांभाळून सुमारे ७ फुटावर वाढलेली दोनशे विविध फळे व फुलांची झाडे विविध सामाजिक संस्था व विविध कंपन्यांना सांभाळ करण्यासाठी व लागवड करण्यासाठी त्यांनी दिली. औद्योगिक आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख यांना जांभळाच्या झाडाचे रोप देऊन या योजनेची सुरुवात करण्यात आली. यावेळी कंपनीचे प्लान्ट मॅनेजर आनंद खेर, उत्पादन विभागाचे प्रमुख तुषार देडगावकर, सरव्यवस्थापक मर्लिन ईलशा उपस्थित होते. दीड वर्षांपासून सांभाळलेली रोपे आता मोठी झाली असून, ही झाडे भविष्यात १०० टक्के वाढतील. योग्य निगराणी व पाणी दिल्यास या झाडांचे भवितव्य निश्‍चितच चांगले असेल, असा दावा चांदोरकर यांनी यावेळी केला. ही २०० रोपे विविध कंपन्या व संस्थांच्या मागणीनुसार त्यांना मोफत देणार असून, एक छोटीशी प्रेमाची अट त्यामध्ये टाकण्यात आली आहे व ती म्हणजे ५ ते ६ महिन्यांनंतर लागवड केलेली ही झाडे आम्ही पाहणार आहोत, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

यावेळी बोलताना देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. एक वेगळाच उपक्रम व पर्यावरण रक्षणाची वेगळीच संकल्पना कंपनीने राबवल्याचे गौरवोदगार व्यक्त केले. ज्येष्ठ रणजीपटू व उद्योजक वसंत (बाबा) चांदोरकर यांनी सुरू केलेली अ‍ॅलविन कॅरमल कलर्स कंपनी ४१ वर्षे जुनी असून, विविध फूड व केमिकलमध्ये वापरले जाणारे नॅचरल रंग तयार करण्याचे उत्पादन ही कंपनी करते. सुमारे २२ देशांमध्ये या कंपनीच्या उत्पादनाला मागणी आहे. कंपनीने सामाजिक बांधिलकी व पर्यावरण रक्षणासाठी वृक्षरोपे तयार करून त्यांचे वृक्षप्रेमींद्वारे संगोपन होण्यासाठीचा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून सुरू ठेवला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post