कोट्यवधीच्या फसवणुकीबद्दल नगर अर्बन बँक गप्प; प्रॉपर्टी व्हॅल्युअरने गाठले पोलिस ठाणे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
तारण ठेवायच्या मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन झाल्याने त्याआधारे २२ कोटीचे कर्ज देणाऱ्या नगर अर्बन बँकेची फसवणूक होऊनही बँक प्रशासन अजूनही गप्पच आहे. मात्र, दुसरीकडे आपल्या हाताखालील व्यक्तीने चुकीचे व्हॅल्युअशन केल्याने त्याच्याविरोधात प्रॉपर्टी व्हॅल्युअरनेच पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असला तरी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी मात्र या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करताना, आपल्या फसवणुकीबद्दल बँक प्रशासन गप्प का, असा सवाल केला आहे.

प्रॉपर्टी व्हॅल्युअर अभिजीत घुले यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचा मदतनीस असलेल्या मुकेश कोरडे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर अर्बन बँकेने पुण्याच्या नेश निब लँक टेक्नोरियल या संस्थेला २२ कोटीचे कर्ज दिले, त्या संस्थेच्या तारण मालमत्तेची व्हॅल्यु अवघी १ कोटी ३९ लाखाची असताना ती २२ कोटीची दाखवली गेल्याने बँकेने तेवढे कर्ज दिले, त्यामुळे बँकेने घुले यांना चुकीचे मूल्यांकन केल्याबद्दल नोटीस पाठवली. त्यावेळी त्यांनी व्हॅल्युअशनची संबंधित कागदपत्रे बँकेकडून मागवून घेऊन तपासली असता त्यांचे लेटरपॅड वापरून व बनावट सही-शिक्के करून ते व्हॅल्युअशन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे व त्याला त्यांचा मदतनीस कोरडे जबाबदार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बँकेच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसात दाखल झालेली फिर्याद दोन वर्षापेक्षा जास्त विलंबाने होत आहे व बँकेची फसवणूक झाल्याचे एवढ्या विलंबाने दाखविले जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हे २२ कोटीचे बोगस कर्जप्रकरण करू नये म्हणून आपण त्याच वेळेस सोशल मीडियावरून जाहीर आवाहन केले होते. पण त्या वेळेस सगळीच मिलीभगत होती व कसे बँकेला लुटले म्हणून सगळेच आनंदात होते आणि आता माकडिणीच्या गोष्टीसारखे चालले आहे. स्वतःला वाचवण्यासाठी पिल्लाला पण पायाखाली घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे, असा दावा करून गांधी यांनी म्हटले आहे की, एकाच दिवसात कर्ज अर्ज, त्याच दिवशी मंजुरी व त्याच दिवशी कर्ज वितरण यात झाले आहे. ज्या पिंपरी चिंचवड येथील बँकेच्या शाखेतून हे कर्ज वितरण झाले, तेथील संबंधित शाखाधिकारी असलेली महिला प्रामाणिक होती. तिने या प्रकरणावर सही करण्य़ास स्पष्ट नकार दिला होता व टेन्शनमुळे ती बिचारी दवाखान्यात अॅडमीट झाली होती. त्यामुळे नगरहून बँकेचा स्पेशल अधिकारी तातडीने बँकेच्या गाडीने पाठवून ही २२ कोटीची सर्व प्रक्रिया घाईने पार पाडली गेली, असा दावाही गांधी यांनी केला. हे २२ कोटी एकमेकात वाटून घेतल्याचा संशय असून याचा शोध पोलिसांनी घेतला तर तसेच कर्जमंजुरीची प्रक्रिया तपासल्यानंतर आणि नगरहून जे स्पेशल अधिकारी या कर्जप्रकरणासाठी घाईघाईने पिंपरी चिंचवडला गेले होते, त्यांच्यासह सर्व संबंधितांना ताब्यात घेतले तर घडाघडा पोपटासारखे बोलतील, असा दावाही त्यांनी केला. 

यातील महत्वाचा मुद्दा असा आहे की, बँकेची फसवणूक झाली असे बाहेरील व्यक्ती म्हणत आहे व पोलीस फिर्याद दाखल करीत आहे, पण बँकेकडून मात्र अजूनही फिर्याद दाखल होत नाही. बरखास्त झालेले संचालक मंडळ सत्तेवर होते, त्यावेळी फिर्याद दाखल होणे शक्य नव्हते. म्हणून मी स्वतः (राजेंद्र गांधी) माझ्या नावाने पोलीस फिर्याद घ्या म्हणून अनेक अर्ज दिले आहेत, पण माझी फिर्याद घेण्यात आली नाही. आता संचालक मंडळाची हकालपट्टी होवून एक वर्ष झाले तरीसुद्धा अजूनही बँकेतर्फे पोलिस फिर्याद दाखल झालेली नाही. त्यामुळे बँकेचे पैसे कसे वसूल होणार, याची शंकाच असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post