'नगर अर्बन'चे कर्जवाटप पोहोचले हायकोर्टात; पोलिसांनी मागवले बँकेचे म्हणणे, गुन्हा दाखल होण्याची चिन्हे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगरमधील बहुचर्चित मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे सध्या गाजत असलेले कर्जवाटप आता हायकोर्टात पोहोचले आहे. औरंगाबाद खंडपीठात दोन याचिका दाखल झाल्या असून, अजून काही याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. दाखल झालेल्या याचिकांबाबत न्यायालयाने पोलिसांकडून व त्यामुळे पोलिसांनी बँकेकडून म्हणणे मागवले आहे. हे म्हणणे देण्यासाठी बँकेने नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यानेही पात्रता नसताना अनेकांना कर्ज दिल्याचे स्पष्टीकरण त्याच्या चौकशी अहवालात दिल्याने आता विशेष वकिलाची नेमणूक करून पोलिसात द्यावयाच्या फिर्यादीचे ड्राफ्टींग सुरू असल्याचे सांगण्यात आले. हे ड्राफ्टींग पूर्ण होऊन पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा बँकेच्या सभासदांना आहे. दरम्यान, बँकेच्या प्रशासकांनीही रिझर्व्ह बँकेकडे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितल्याचे समजते. त्यामुळे आता या परवानगीनंतर गुन्हा दाखल होतो की आधीच होतो, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

आम्हाला दिलेल्या कर्जापैकी काही रक्कमच आम्हाला मिळाली, बाकी रक्कम अन्य खात्यांतून वळवली गेली व पूर्ण रकमेचे हप्ते भरण्याची वेळ आमच्यावर आल्याने याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काहीजण न्यायालयात गेले असल्याचे समजते. दाखल याचिकांबाबत पोलिसांचे म्हणणे मागवण्यात आले आहे. पोलिसांनीही मग बँकेकडून म्हणणे मागवले असून, ते देण्यासाठी बँकेने नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यानेही तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याने फौजदारी कारवाई आवश्यक असल्याचे मत स्पष्ट केल्याने त्यानुसार आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी बँकेने तज्ज्ञ वकिलाची नेमणूक केली असून, त्यांच्याद्वारे पोलिसात द्यावयाच्या फिर्यादीचा मजकूर तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ते पूर्ण झाल्यावर त्यानुसार पोलिसात तक्रार दाखल होणार असल्याचे समजते.

दरम्यान, नगर अर्बन बँक शुद्धीकरण मोहिमेचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले की,
औरंगाबाद हायकोर्टात पिटीशनची रांग लागली आहे. काही पिटीशनमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाचे म्हणणे मागविण्यात आले आहे. त्यामुळे आता दोषींवर कारवाई होणार असल्याने बँकेचे कर्मचारी, अधिकारी, संचालक यांनी, जे खरे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध अफेडेव्हीट करून पोलीस स्टेशनला दिले पाहिजे. तुम्ही खऱ्या दोषींना उघडे करा व स्वतःला वाचवा, असे आवाहनही केले आहे तसेच निरपराध व निष्पाप व्यक्तींना मदत करण्याची ग्वाहीही दिली आहे. पोलीस स्टेशनमधून बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना जबाबासाठी पाचरण केले जात असल्याने त्यांनी आता जे काही सत्य आहे, ते सांगून टाकले पाहिजे. सर्व कागदपत्रे पोलिसांकडे व न्यायालयात सादर झाली आहेत आणि कागदपत्रे बदलू शकत नाही. बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे, याची कागदपत्री नोंद झाली आहे. त्यामुळे, जे खरे दोषी आहेत त्यांनाच शासन व्हावे ही आमची तळमळ आहे, असे सांगून राजेंद्र गांधी म्हणाले, बँक अधिकारी वा कर्मचाऱ्यांना कोणी खोटी आश्वासने वा प्रलोभने दाखवत असेल तर तो त्यांना अडकवण्याचा डाव आहे व ते त्यांनी वेऴीच ओळखून आतातरी सावध झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी संचालक पुढे येणार?
नगर अर्बन बँकेत झालेले चुकीचे कर्जवाटप व आर्थिक घोटाळ्याबाबत काही माजी संचालक भूमिका मांडणार असल्याचे समजते. संचालक मंडळांच्या बैठकांतून होणाऱ्या चर्चा, इतिवृत्ताचे झाले नसलेले सादरीकरण, बँकेविषयी सोशल मिडिया व प्रसिद्धी माध्यमांतून येत असलेल्या वृत्ताकडे दुर्लक्ष करण्याचे नेत्यांकडून दिले जात असलेले सल्ले, बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यावर व संबंधित नेत्याने बँकेच्या प्रशासनावर फोडलेले खापर, अशा अनेकविध मुद्यांच्याआधारे काही संचालक बँकेच्या झालेल्या दुरवस्थेचा पर्दाफाश करणार असल्याचेही समजते. त्यामुळे त्याचीही प्रतीक्षा बँकेच्या सभासदांना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post