ग्रामदैवत विशाल गणेशाचा गणेशोत्सव यंदा ऑनलाइन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगरचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिराचा गणेशोत्सव भाविकांना ऑनलाइन पाहता येणार आहे. कोरोनामुळे मंदिरे अद्याप बंद आहेत, त्यामुळे विशाल गणेश मंदिरातील यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने होणार आहे. मात्र, नगरसह देशविदेशातील गणेश भक्तांना या ११ फुटी भव्य गणपतीचे घरबसल्या दर्शन युट्युब व फेसबुकवर होणार आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे आता ऑनलाइन दर्शन सुविधेला जोडले गेले आहेत.
विशाल गणेशाचे दर्शन मोबाईलवर फेसबुक व यु ट्यूब द्वारे घेता यावे म्हणून आवश्यक तांत्रिक सुविधा करण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात येत असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवात विशाल गणेशाचे भाविकांना नियमित दर्शन घेता जावे तसेच मंदिरातील गणेशोत्सव पाहता यावा म्हणून माळीवाडा पंच मंडळाच्या श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी ऑनलाईन दर्शन सुविधेचा निर्णय घेतला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली. या लाईव्ह दर्शनासाठी वेगळा व्हिडीओ कॅमेरा अथवा मोबाईल वापरलेले नाहीत. मंदार मुळे यांनी मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग करण्यात आला आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मकरंद घोडके व वैभव घोडके यांनी तांत्रिक मदत केली आहे.

शनिवारी (२२ ऑगस्ट) जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हे सीसीटीव्ही लाईव्ह फेसबुक-युट्युबवर दिसणार आहे. मंदिराबाहेरही राजू ढोरे यांच्या सहकार्याने एल ई डी वॉल लावण्यात आली असून, त्यावरून देखील श्रींची मूर्ती व गाभाऱ्यातील धार्मिक कार्यक्रम थेट प्रक्षेपित होणार आहेत. विशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर तसेच अधिकृत यु ट्यूब चॅनेलवर भाविकांना लाईव्ह दर्शन होणार आहे.

देवस्थानचे अधिकृत फेसबुक पेज मराठीत विशाल गणपती देवस्थान ट्रस्ट, अहमदनगर हे आहे. विशाल गणपती हे देवस्थानचे अधिकृत यु ट्यूब चॅनेल आहे. गणेशोत्सव काळात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार नाहीत. मात्र, दैनंदिन महाआरती, गणेश याग तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हे करीत असताना सोशल डिस्टंसीगचे नियम पाळण्यात येणार असल्याने नगरकरांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये. घरी बसूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post