मनपाचे शिक्षक रोज जातात वीटभट्टीवर.. शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रम सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या सेवासुविधांबद्दल एकीकडे नागरिक नाके मुरडत असले तरी महापालिकेचे काही शिक्षक मात्र महापालिकेचे नाव रोशन करण्याचे काम करीत आहेत. केडगावच्या ओंकारनगर या महापालिकेच्या पहिल्या 'आयएसओ' शाळेचे शिक्षक सध्या रोज विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवत आहेत. अगदी वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना शाळेचा अभ्यास शिकवण्यासाठी हे शिक्षक रोज वीटभट्ट्यांवर जातात. मनपा शिक्षकांच्या या निरलस सेवेचे शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे.

महापालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीचे ७४ विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. यापैकी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आहेत, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक ऑनलाईन शिक्षण देत आहेत. पण काही पालकांकडे स्मार्टफोन नाहीत, तर काही पालकांकडे इंटरनेट नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वॄषाली गावडे यांनी अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा गटा-गटाने अभ्यास घेण्याचे काम सुरू केले आहे. ७४ विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आहेत, पण बाकीच्यांकडे नाही. अशा सुमारे २०-२५ विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवले जात आहे. या शाळेपासून सुमारे एक-दीड किलोमीटर अंतरावरील काकडे मळा वीटभट्टी, सचिन नगर, श्रीकृष्णनगर, पाच गोडावून, शाहूनगर परिसरातील या मुलांना रोज सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत घरी जाऊन शिकवले जात आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात आवश्यक सुविधेअभावी सहभागी होऊ शकत नाहीत, अशा या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी छापील अभ्यास तयार केला आहे. हा अभ्यास विद्यार्थ्यांना घरी जाऊन सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून शिक्षक सोडवण्यास मदत करतात. शिक्षकांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होत आहे.

विद्यार्थ्यांना आठवड्याचा अभ्यास दिला जातो व पुढील आठवड्यात तो तपासून पुन्हा नवीन अभ्यास दिला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या अडचणी असताना या विद्यार्थ्यांचा नियमितपणे अभ्यास सुरू आहे. तसेच घरोघरी जाणारे हे शिक्षक संबंधित विद्यार्थी व पालकांची कोरोनाबाबत जनजागृती करीत आहेत. ओंकारनगर शाळेतील शिक्षकांच्या या उपक्रमाचे मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे, विषयतज्ञ अरुण पालवे यांनी कौतुक केले आहे. कोरोना लॉकडाऊन काळात या शाळेतील शिक्षकांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने किराणा व भाजीपाला गरीब विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला उपलब्ध करून दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post