अनैतिक संबंधांतून जोडीने संपवले जीवन? पाथर्डी पोलिसांकडून तपास सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माणिकदौण्डी शिवारात दोन दिवसांपूर्वी एका पुरुष व महिलेने आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. अनैतिक संबंधांतून या जोडीने जीवन संपवल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पैठणच्या असलेल्या या जोडीने पाथर्डी तालुक्यात येऊन जीवन संपवण्याची घटना पाथर्डीत खळबळ उडवून गेली आहे. यासंदर्भात पाथर्डीचे पोलिस तपास करीत आहेत.

यासंदर्भातील माहिती अशी की, गुरुवारी (६ ऑगस्ट) एका महिला व पुरुषाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे उघडकीस आली.  हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, माणिकदौण्डी येथील एका हॉटेलपासून काही अंतरावर दोन व्यक्तींचे मृतदेह एका दुचाकीजवळ पडले असल्याची माहिती माणिकदौण्डीच्या सरपंचांनी पाथर्डी पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी गेले असता त्याठिकाणी अंदाजे ३५ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिलेचा मृतदेह एका दुचाकीजवळ पडलेला असल्याचे आढळले. नंतर पोलिसांनी पुरुषाच्या खिशाची तपासणी केली असता त्यात एक ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावर या व्यक्तीचे इंद्रजित वाल्मिक इंगळे असे नाव होते व तो पैठण येथील एका बँकेत नोकरी करीत असल्याचे या ओळखपत्रावरून पोलिसांना समजले तर या व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईलवर इंद्रजित याचे वडील वाल्मिक इंगळे यांचे कॉल आलेले होते. यानंतर पोलिसांनी वाल्मिक इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तो आपला मुलगा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आणखी चौकशी केली असता इंद्रजित इंगळे याच्यासोबत ज्या महिलेचा मृतदेह आढळून आला, ती महिला इंद्रजित इंगळे पैठणला ज्या जागेत राहात होता, त्याच परिसरातील असल्याचे तपासात आढळून आले. दोघांच्या मृतदेहाजवळ एक विषारी औषधाची बाटलीही आढळून आल्याने या दोघांनीहि विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले तर ज्या महिलेचा मृतदेह आढळून आला त्या महिलेने आपल्या घरी, मी जामखेड येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जाते असे सांगितल्याचे समजते. यासंदर्भात पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एच.सी. रांजणे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post