भाजपचे हात दाखवून अवलक्षण.. आंदोलन नेतृत्व झिडकारताना अण्णांनी काढले मोदींचे वाभाडे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
दिल्ली भाजपने तेथील आम आदमी पक्षाच्या सरकारविरुद्ध आंदोलन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिल्लीत बोलावून नेतृत्व करण्याची विनंती केली खरी, पण भाजपची ही भूमिका हात दाखवून अवलक्षण ठरली आहे. अण्णांनी भाजपचा आंदोलन नेतृत्वाचा प्रस्ताव नाकारताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईचे व कठोर पावले उचलले असल्याचे दावे फोल ठरले काय, अशा शब्दात मोदींचे व भाजपचे वाभाडे काढले आहेत.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत येऊन भाजपला साथ देण्याची विनंती केली होती. तसे पत्र हजारेंना मिळाल्यावर त्यांनी गुप्ता यांना पत्र रुपानेच उत्तर पाठवले असून, दिल्ली भाजपच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यास स्पष्ट नकार देताना, केंद्रातील मागील सहा वर्षांपासूनच्या भाजप सरकारवर टीकाही केली आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषय केंद्र सरकारच्याअंतर्गत आहेत. सीबीआय, इकॉनॉमिक ऑफेन्स, व्हिजीलन्स, दिल्ली पोलिस केंद्राच्या नियंत्रणात आहेत. तसेच भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली असल्याचे दावे पंतप्रधान नेहमी करतात, मग दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्र सरकार कारवाई का करीत नाही, भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे दावे फेल ठरले काय, असा सवालही हजारेंनी या पत्रात केला आहे.

मी कोणत्याही पक्षाकडून कधी आंदोलन केले नाही, २२ वर्षात २० उपोषण आंदोलन करताना सर्वपक्षीय सहा मंत्र्यांना पदावरून हटवले आहे. पण माझ्या आंदोलनामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांनी मला नेहमी त्यांच्या विरोधी पक्षाचे हस्तक ठरवले व माझ्यावर टीका केली. पण त्यामुळे मला अजिबात फरक पडलेला नाही. विशेष म्हणजे, भाजप केंद्रात सहा वर्षांपासून सत्तेत आहे व जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असल्याचा दावा करीत असताना माझ्यासारख्या सत्ता नसलेल्या फकीर माणसाला आंदोलन करण्यासाठी बोलावते, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीकाही हजारेंनी केली आहे. देशातील सध्याचा कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देऊ शकत नाही, सत्तेतून पैसा व पैशांतून सत्ता अशा चक्रात सर्वच पक्ष आहेत. व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे मी पुन्हा दिल्लीला येऊन फारसा काही फरक पडणार नाही, असेही हजारेंनी आवर्जून स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post