एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : 'आश्रम' ही वेब सीरिज २८ ऑगस्टला एम् एक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, तिचे प्रसारण रद्द करण्याची मागणी हिन्दू जनजागृति समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन पाठवले असून, त्यात ही वेबसिरीज हिंदू धर्माविरुद्ध असल्याचा दावा केला आहे.
या वेब सिरीजचा अधिकृत ट्रेलर प्रसारित झाला असून, त्यावरून हे स्पष्ट होते की, 'आश्रम' ही वेब सीरिज केवळ हिंदु धर्माला अपकीर्त करण्याच्या आणि हिंदूंचे मन कलुषित करण्याच्यादृष्टीने बनवण्यात आल्याचे दिसत असल्याने या सिरीजचे प्रसारण रद्द करावे, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच सध्याच्या वेब सीरिज निर्मितीवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही व्यवस्था नसल्याने कलेच्या नावाखाली अश्लीलता, भडक हिंसा, हिंदु द्वेष, सैन्याचा अवमान, राष्ट्रद्रोह आदी मोठ्या प्रमाणावर दाखवले जाते. याला विरोध केल्याने नुकतेच केंद्र सरकारने सैन्यविषयक वेब सीरिज बनवण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र घ्यावे, असे निर्देश दिले होते. त्याच धर्तीवर वेब सीरिजच्या माध्यमातून होणारे हिंदु धर्म आणि श्रद्धास्थाने यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे (सेन्सॉर बोर्डाकडे) या सर्व वेब सिरीजचे नियंत्रण द्यावे, तसेच या मंडळामध्ये धार्मिक अधिकारी व्यक्तींची नेमणूक करावी, अशी मागणीही शिंदेंनी या निवेदनात केली आहे.
कलाकृतीच्या निर्मितीमध्ये कल्पना स्वातंत्र्य असले, तरी त्या कल्पनेच्या आधारे समाजाचे श्रद्धा भंजन करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे निवेदनात स्पष्ट करून शिंदेंनी म्हटले आहे की, 'आश्रम' वेबसीरिजमधून भोंदू बाबांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून हिंदूंचे श्रद्धाभंजन करण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आहे व हिंदूंच्या आश्रमव्यवस्थेविषयी समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. हिंदु जनजागृती समिती याचा निषेध करते व केंद्र सरकारने विज्ञापने, चित्रपट, नाटके, वेब सिरीज आदींच्या माध्यमातून होणारे हिंदु देवदेवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखणारा कायदा आणावा, अशी मागणी करीत आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
Post a Comment