मंदिरांसमोर शनिवारी होणार घंटानाद; भाजपचे 'दारू नको-भक्तीचे दार उघड' आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाच्या थैमानामुळे राज्यभरातील सर्वधर्मिय प्रार्थनास्थळे बंद आहेत. मात्र, भाजपने मंदिरे उघडण्यासाठी येत्या शनिवारी (२९ ऑगस्ट) राज्यभरातील मंदिरांसमोर सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन जाहीर केले आहे. नगर शहरामध्येही असे आंदोलन होणार असल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी स्पष्ट केले आहे.

'दार उघड उद्धवा दार उघड....दारू नको...भक्तीचे दार उघड....मदिरा चालू...मंदिर बंद... उद्धवा, तुझा कारभाराच धुंद, भक्तांना जेल-गुन्हेगारांना बेल' असे या घंटानाद आंदोलनाचे स्वरूप असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन तसेच फेस मास्कचा वापर करून आपापल्या कार्यक्षेत्रात या आंदोलनात सहभागी व्हावयाचे आहे व आपण सहभागी झाल्याचे वृत्त, छायाचित्र 8657718220 या व्हाट्स अपवर पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील संत-महंत,आचार्य, धर्माचार्य, धार्मि, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने व तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिक राज्यात धार्मिक स्थळे-मंदिरे सुरू करण्यासाठी हे आंदोलन करणार आहेत. य़ा आंदोलनाला भाजपने पाठिंबा देताना त्यात भाग घेण्याचे जाहीर केले आहे. शिर्डीमध्ये साईसमाधी मंदिराजवळ खा. डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी आंदोलन होणार आहे. राज्यभरातील या आंदोलनात वारकरी संघटनाही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंदिरे व जीम सुरू करण्याबाबत सरकारचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले असले तरी गणेशोत्सवानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पितृपंधरवडा सुरू होत असल्याने या काळात मंदिरे सुरू कशी करता येतील, असाही आक्षेप काहींनी घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post