शिवसैनिक ५ ऑगस्टला मोदींचे नेतृत्व स्वीकारतील : खा. डॉ. सुजय विखेंचा दावा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राम मंदिर आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेचे कार्यकर्तेही होते. त्यामुळे सेनेच्या वरच्या नेत्यांनी सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकला असला तरी शिवसैनिक मात्र ५ ऑगस्टला अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारतील, असा दावा नगर दक्षिण जिल्ह्याचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.

भाजपच्या दूध दर वाढ आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केंद्राकडे मदतीसाठी सतत हात पसरण्यापेक्षा राज्य सरकारने स्वतःहून दूध पावडर निर्यातीचे प्रयत्न केले पाहिजे, दुधाला किमान ३० रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे. पण जनतेच्या मनाविरोधात स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीचे सरकार बनले आहे. या तिन्ही पक्षाच्या आमदारांनी मंत्रीपदासाठी आघाडी केली. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनात भाजप समवेत काम केले आहे, आंदोलने केली, काही त्यात शहीद झाले. पण त्यांच्या वरच्या नेत्यांनी सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकला असला तरी कार्यकर्त्यांनी स्वतःमध्ये तो राखला आहे. त्यामुळे ५ ऑगस्टला राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी हे कार्यकर्ते मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारतील व त्याचे पडसाद राज्यातील महाविकास आघाडीच्या भविष्यावर निश्चितच उमटतील, असा दावाही डॉ. विखे यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post