महात्मा फुले जीवनदायिनीची उधारी आधी द्या; खासदार विखेंची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मागील भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे केली.

महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या अँजिओप्लास्टी व अन्य वैद्यकीय उपचारांचे पैसे विमा कंपनी बदलल्यामुळे मागील ३ महिन्यांपासून मिळालेले नाहीत, कोरोनामुळे महापालिका हद्दीतील प्रसुती सेवा मी विखे हॉस्पिटलद्वारे दिली, सिझरला १९ हजार व नॉर्मल डिलेव्हरीला ९ हजाराप्रमाणे आकारणी केली, पण त्या १५० ते २०० प्रसुतींच्या ५० लाखाच्या रकमेपैकी १ रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही, त्यामुळे महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या उपचारांचे पैसे देण्याची शाश्वती महाविकास आघाडी सरकारने आधी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांची तसेच आकारल्या जाणाऱ्या बिलांच्या तपासणीसाठी भरारी पथके नेमण्याची बाब योग्य आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र, या चौकशीमध्ये या रुग्णालयांमध्ये खरी काय स्थिती आहे, रुग्णांना तेथे उपचार मिळतात की नाही किंवा संबंधित रुग्णाला खरेच उपचार गरजेचे आहेत का, याची शहानिशा गरजेची असल्याचे आपले मत आहे. या भरारी पथकाच्या तपासणीची सुरुवात माझ्या रुग्णालयापासून जरी केली तरी माझी हरकत असणार नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, खासगी रुग्णालयांमध्ये दर जास्त घेतले जातात, असे बोलले जात असले तरी दुसरीकडे आज कर्मचारी मिळत नाही, डॉक्टर मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. त्याचे कोण नियोजन करणार. अनेकजण काम करायला तयार नाही. सगळ्यांना दर पंधरा दिवसांनी पगार दिला जातो, म्हणून हा गाडा चालवायचा कसा, याचाही विचार केला पाहिजे. अर्थात अवाजवी बिल आकारणी झाली असेल तर ती बाब दुर्दैवी आहे, असेही विखे स्पष्ट केले.

तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना विचारा हो
डॉ. विखे यांच्या नगर शहरात लॉकडाऊन करण्याच्या मागणीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती व लॉक़डाऊनची गरज नसल्याचे म्हटले होते. त्यावर भाष्य करताना डॉ. विखे यांनी, पुण्यामध्ये पुन्हा लॉकडाउन का केले, हे तुम्ही (रोहित पवार) तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) विचारले पाहिजे. जामखेड व पारनेरला लॉकडाऊन करून तुम्ही (रोहित पवार) तुमचे मतदारसंघ सुरक्षित ठेवता व आमचे नगर लॉकडाऊन न करून धोक्यात ठेवता. जेथे राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यांतून लॉकडाउन झाले आहे, पण नगरला राष्ट्रवादीचे पालकमंत्री असूनही होत नाही, याला काय म्हणायचे, असा सवाल करून डॉ. विखे म्हणाले, 'सोशल मीडियाचा वापर सर्वजण करीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री सोशल मिडियाच्या माध्यमातून वेगळाच अजेंडा राबवत आहेत. जी कामे झालीच नाहीत, ती पण झाल्याची दाखवत आहेत. भूमिपूजने दाखवली जात आहेत, पण शासनाकडे ते काम करण्यास निधी आहे का, हे सांगितले जात नाही. भाजपच्या लोकांनी केलेल्या कामांची उद्घाटने राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री करीत आहेत व ते सोशल मिडियावर टाकून त्या कामांचे श्रेय घेत आहेत, या पार्श्वभूमीवर, आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया वापरणारच ना, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार तर ट्रॅक्टर चालवण्याचे, औषध फवारणी करण्याचे उद्घाटन केल्याचे फोटो टाकतात, असा दावाही त्यांनी केला.

संगमनेरच्या आमदारांनी लक्ष घालावे
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील घरांना समृद्धी महामार्गासाठीच्या दगड खाणीमुळे तडे गेल्याबाबत बोलताना, तेथील (संगमनेर) आमदारांनी यात लक्ष घातले पाहिजे, असे मत डॉ. विखे यांनी व्यक्त केले. उत्तर नगर जिल्ह्याचे खासदार वेगळे आहेत, संगमनेर तालुक्याचे आमदार वेगळे आहेत. तो माझ्या मतदारसंघातील प्रश्न नाही. तेथील खासदार, आमदारांनी यामध्ये लक्ष घालावे व त्यांचा विषय त्यांनी मार्गी लावणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post