'बायका' आरोपाला 'क्षमता' उत्तर; प्रा. शिंदे-खा.लोखंडेंमध्ये रंगली जुगलबंदी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्य सरकारला 'एका नवऱ्याच्या दोन बायका' अशी उपमा देणाऱ्या भाजपच्या माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना, 'दोन बायकाच काय तर चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते आहेत', असा दावा करून जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. कर्जत-जामखेडमध्ये कधीकाळी भाजपमधील राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोखंडे व प्रा. शिंदेचा कलगीतुरा सेना-भाजपमधील संघर्षाला नवी चर्चा देऊन गेला आहे.

दुधाला भाववाढ मिळण्याच्या मागणीसाठी भाजपने शनिवारी राज्यभर आंदोलने केली. कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे बोलताना माजी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 'हे सरकार म्हणजे तिघाडी सरकार आहे. एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत. हा पूर्णपणे खेळ आता आवरत आला आहे व मोडकळीस आला आहे. या सरकारला जनतेशी व शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. त्यामुळे हे सरकार कधी कोसळेल, याचा पत्ता लागणार नाही, गेल्या ७-८ महिन्यात जनतेला दिलासा देणारा एकही निर्णय सरकारने घेतला नाही', असा घणाघात प्रा. शिंदे यांनी केला. 'दुधाची खरेदी कमी दराने होते व बाजारात विक्री मात्र ५०-६० रुपये लिटर दराने होते, वीज बिले अव्वाच्या सव्वा आली आहेत, युरिया मिळत नाही, कांदा-दुधाला भाव नाही, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही', अशी टीकाही प्रा. शिंदे यांनी केली.

या टीकेला शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सडेतोड उत्तर दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रा. शिंदेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. 'दूध उत्पादकाला न्याय मिळण्याची खासदार म्हणून माझी मागणी आहेच. दूध पावडर निर्यातीला जशी केंद्र सरकारने सबसिडी दिली पाहिजे, तशी राज्य सरकारनेही दिली पाहिजे, असेही माझे म्हणणे आहे. पण भाजपचे नेते बोलतात, एका नवऱ्याच्या दोन बायका, पण ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन बायकाच काय कितीही बायका सांभाळू शकतो. दोन बायकाच काय तर चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते आहेत', असे खा. लोखंडेंचे प्रत्युत्तर प्रा. शिंदेंच्या टीकेला जोरदार टोला हाणून गेले. पण महाविकास आघाडी व भाजपच्या संघर्षमय राजकारणात कधीकाळी एकमेकांचे सहकारी व मित्र असलेले तसेच लोखंडे हे कर्जत-जामखेडचे १५ वर्षे आमदार असताना नेहमी जोडीने फिरणारे प्रा. शिंदे व खा. लोखंडे दूध दराच्या आंदोलनावरून एकमेकांवर टीकेची झोड उठवताना 'बायका व नवऱ्याची क्षमता' यावर भाष्य करू लागल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post