काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात


एएमसी मिरर वेब टीम 
लखनऊ : काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी नितीन राऊत चालले होते. पण नितीन राऊत यांना पोलिसांनी आझमगड सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. काँग्रेसने ट्विट करत ही माहिती दिली आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली होती.

काँग्रेसने ट्विट करत उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकलं नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली होती. हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत दौऱ्यावर गेले असता त्यांना रोखण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली.

पोलिसांनी रोखल्यााने नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर बसून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. राऊत यांच्यावरील पोलीस कारवाईमुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post