सॅनिटायझरचा बाजार जोरात; बहुतांश 'कोरोना निरुपयोगी' असल्याचा 'जागरूक'चा दावा


एएमसी मिरर वेेेब टीम
अहमदनगर : कोरोनामुळे सॅनिटायझरचा बाजार जोरात असून, यात कोट्यवधीची उलाढाल होत असली तरी बहुतांश सॅनिटायझर कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी असल्याचा दावा येथील जागरूक नागरिक मंचाने केला आहे. निरुपयोगी गोष्टींचा केवळ अंधानुकरण करून खरेदीचा सपाटा जर लावला तर बोगस उत्पादकांचीच चांदी होईल. त्यामुळे अशी उत्पादने शोधून व फसवे शब्द वापरून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यास जागरूक नागरिक मंच प्रशासनास भाग पाडेल, असा दावाही मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी केला आहे. 

भारतात मागील तीन महिन्यात तब्बल ८९ कोटी लिटर( किंमत ९ हजार कोटी रुपये) सॅनिटायझरची विक्री झाली असल्याचा दावा मुळे यांनी केला आहे. सध्या सामान्य लोकांबरोबरच सुशिक्षित लोकांच्याही अज्ञानाचा गैरफायदा करोनाच्या काळात बोगस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी उठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वांनी अंधानुकरण न करता सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून करोनाविरोधी दावा असलेल्या सॅनिटायझर किंवा इतर उपकरणांची खरेदी डोळे झाकून करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

सध्या बाजारात असलेल्या अनेक सॅनिटायझरवर लिहिलेले आहे की ९९ टक्के जर्म(जंतू) या सॅनिटायझरने मरतात किंवा ९९ टक्के बॅक्टेरिया या सॅनिटायझरने मरतात, असे लिहिलेले आढळते. पण हे फसवे शब्द आहेत, परंतु कुणीच विचार करीत नाही की, करोना व्हायरस हा जर्म (जंतू) देखील नाही व बॅक्टेरिया (जिवाणु) देखील नाही, तो एक अतिसूक्ष्म व्हायरस म्हणजे विषाणू आहे. त्यामुळे जर्म आणि बॅक्टेरिया असे शब्दप्रयोग फसवे आहेत, जंतु, जिवाणु आणि विषाणु यामधे जमीन-आसमान इतका फरक आहे. त्यामुळे जंतु व जिवाणु मारणारे सॅनिटायझर हे विषाणूदेखील प्रभावीपणे मारूच शकत नाही आणि दुकानात फक्त अशा सॅनीटायझरचीच मागणी करावी की, ज्यामुळे कोरोनासारखा अतिसूक्ष्म विषाणू (व्हायरस) नामशेष होऊ शकेल. जर्म आणि बॅक्टेरिया असे फसवे शब्द वापरून सुशिक्षित लोक देखील गंडवले जात आहेत तसेच कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी या उत्पादकांनी आपल्या उत्पादनांवर "व्हायरस" हा शब्द देखील वापरणे टाळले आहे, हे सुज्ञ लोकांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे अशा प्रकारच्या उत्पादनांवर जर‌ फक्त बॅक्टेरीया किंवा जर्म असे शब्द लिहिलेले असतील तर ते कदापि खरेदी करू नयेत, असेही मुळेंनी सुचवले आहे. हातावर सॅनिटायझर मारले, या मनाच्या खोट्या समाधानाव्यतिरिक्त त्याचा या करोनासारख्या अतिसूक्ष्म विषाणूवर काहीही परिणाम होणार नाही व काहीही उपयोग होणार नाही, असा दावाही मुळे यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post