१३ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून क्रूरपणे हत्या

  
एएमसी मिरर वेब टीम 
लखनऊ : मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनामुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय दलित मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसह शरीराच्या इतरही अवयव कापल्याची भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरिया गावात मुलीच कुटुंब राहते. मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ऊसाच्या एका शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, यात ऊसाच्या शेताचा मालक असलेल्याचाही समावेश आहे.

मुलगी शौचासाठी शेतात गेल्यानंतर गावातील दोन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आरोपींनी पीडितेची हत्या करण्यापूर्वी प्रचंड हाल केल्याचंही समोर आलं आहे. आरोपींनी क्रूरपणे पीडितेचे डोळे फोडले. त्याचबरोबर तिची जीभही कापली. गळ्याला फास लावून तिला ओढण्यात आलं. पीडितेचा जीव गेल्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणात मयत पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेली तक्रार आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारावरून पोलिसांनी दोन तरुणांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संताप व्यक्त केला. “समाजवादी पक्ष आणि भाजपा सरकारच्या काळात काय फरक आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post