एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यातील डाळिंबे, पेरू व अन्य फळांसह लिंबू-काकडी व अन्य भाज्यांना देशाच्या विविध भागातील बाजारपेठ मिळणार आहे. केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेली किसान रेल्वे शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दुपारी साडेतीन वाजता नगरच्या रेल्वे स्थानकावर येणार असून, अन्य राज्यातील विक्रेत्यांना नगर जिल्ह्यातून पाठवण्यात येणारी फळे व भाजीपाला पार्सल घेऊन पाटण्याला रवाना होणार आहे.
शेतकऱ्यांचे शेती उत्पादन खराब न होता इतर राज्यात तत्परतेने जाण्यासाठी ही विशेष किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २०२० च्या रेल्वे अर्थसंकल्पात किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ही रेल्वे सुरू केली आहे. जिल्ह्यात येणारी पहिली किसान स्पेशल पार्सल रेल्वे कोल्हापूरहून नगरला येणार आहे. नगरहून भाजी व फळे पार्सल घेऊन मनमाडला जाणार आहे. तेथे देवळाली कॅम्प (नाशिक) य़ेथून येणाऱ्या मुख्य किसान रेल्वेला जोडली जाऊन मग ही रेल्वे पाटण्याकडे कूच करणार आहे व बिहारमधील धानापूर येथे ही रेल्वे ३२ तासात पोहोचेल. ही किसान स्पेशल पार्सल ट्रेन आठवडयातून एकदा धावणार आहे. नगर रेल्वे स्थानकावर आधी दर गुरुवारी ही गाडी येण्याचे नियोजन होते. पण पहिलीच ही रेल्वे गाडी एक दिवस लेट झाली आहे. शुक्रवारी दुपारी ती येणार आहे. त्यानंतर पुढच्या गुरुवारी की शुक्रवारी ती येणार, हे निश्चित झाल्यावर त्यानुसार पार्सल नियोजन केले जाणार आहे. येणाऱ्या या रेल्वेगाडीला नगरला थांबा देण्यात आला आहे.
या गाडीबद्दल माहिती देताना स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर व मुख्य वाणिज्य निरीक्षक रामेश्वर मीना यांनी सांगितले की, नगर शहर व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती माल उत्पादन, फळे, भाज्या, दूध हे इतर राज्यात या पार्सल गाडीच्या मध्यातून वेगाने पोचणार आहे. यासाठी डीप फ्रीजची व्यवस्था असलेले डबे या पार्सल ट्रेनला जोडण्यात आले आहेत. नगर रेल्वे स्थानकावरून ही गाडी सर्व शेतीमाल घेऊन मनमाडमार्गे जाणार आहे. शेतकऱ्यांना आपला माल इतर राज्यात विकून व्यवसाय वाढवता यावा यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची ही ट्रेन ठरणार आहे. नगर स्टेशनवर थांबा असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल अन्य राज्यातील विक्रेत्यांना पाठवता येणार आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या पार्सल विभागाशी ( फोन-0214-2471381) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment