अण्णाभाऊंना 'भारतरत्न'साठी जिल्ह्यातून जाणार २ लाख पत्रे; लहुजी शक्ती सेना पंतप्रधान मोदींना पत्रे पाठवणार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना 'भारतरत्न' सन्मान देण्याची मागणी करणारी २ लाख पत्रे येत्या १५ ऑगस्टपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली जाणार आहेत. लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाच्यावतीने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट, कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष जयवंत गायकवाड, राजू रोकडे, युवक संपर्क प्रमुख संतोष उमाप, साहेबराव अवचर, प्रतीक वैराळ, माऊली रोकडे उपस्थित होते. अण्णाभाऊंनी महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात अग्रगण्य कार्य केले आहे. दीनदलित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी काम करताना त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळावे ही मातंग समाजाची मागणी आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यासाठी लहुजी शक्तीने पुढाकार घेतला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक आमदार व खासदारांचे शिफारसपत्र घेण्यात आले आहे. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातून २ लाख पत्र पाठविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्य सरकारकडे अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क व ड नुसार वर्गवारी करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post