युवक काँग्रेस मागतेय मोदींकडे २० लाख कोटींचा हिशेब


विविध समाज घटकांना भेटून जाणून घेतल्या जात आहेत अडचणी

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाच्या महामारीच्या काळात रोजगार व उद्योग व्यवसाय बुडालेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते, या पॅकेजनुसार कोणाला काय दिले, याचा हिशेब मागण्याचे आंदोलन प्रदेश युवक काँग्रेसने हाती घेतले आहे. १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनात छोट्या व्यावसायिकांना व समाज घटकांना भेटून त्यांना केंद्र सरकारकडून काही मदत मिळाली की नाही, याची खातरजमा केली जात आहे. संबंधित व्यावसायिकांच्या व्हीडिओद्वारे अडचणी जाणून घेऊन त्या सोशल मिडियावर व्हायरल केल्या जात आहेत. दोन दिवस झालेल्या या आंदोलनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसने पंतप्रधान मोदींना थेट सवाल केला असून, कहा गये वो २० लाख करोड?, अशी विचारणा याद्वारे केली आहे. 

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. यात पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजचा हिशोब मागितला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी १२ मे २०२० रोजी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यामुळे या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना या २० लाख कोटी पॅकेजचा काही लाभ मिळाला आहे की नाही, याची माहिती घेताना त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडीओ चित्रित केल्या. तसेच पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून मागण्या समोर ठेवायला त्यांना मदतही केली. रोज एका समाज घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर या आंदोलनात ठेवण्यात येणार आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली का, नोकरदारांच्या काय अडचणी आहेत, बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली याचा पर्दाफाश युवक काँग्रेस यातून करीत आहे. या सर्वांच्या मागण्या व्हिडिओचित्रण करून तसेच पंतप्रधान कार्यालयाला फोन करून व पत्र लिहून केंद्र सरकारला जाब विचारणार आहे. 

२० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून जवळपास ३ महिने उलटलेत. पण प्रत्यक्षात मदत कुठेही पोहोचलेली नाही, असे प्रदेश युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. २० लाख करोड पॅकेजबाबत उद्योजकांमध्येही नाराजी आहे, असा दावा तांबे यांनी केला. लघु व मध्यम उद्योगक्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे आहे. सरकारने आर्थिक मदत व जीएसटीमध्ये सवलत देणे गरजेचे होते. तीसुद्धा दिली नाही. शेवटी शेतकऱ्यांप्रमाणेच लघु व मध्यम उद्योजकांच्या तोंडास पाने पुसण्यात आली आहेत. २० कोटींचे पॅकेज हासुद्धा जुमलाच होता, हे आता सिद्ध झाले आहे, असा दावाही त्यांनी केला. छोटे व्यापारी व उद्योजकांना काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची घोषणा पोकळ होती, हे स्पष्ट झाले आहे. जीएसटीमध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. कर संकलन पूर्वीसारखेच आहे. जे २० लाख करोडमध्ये कर्ज आहे, तेदेखील व्याजासकट वसूल केले जाणार आहे. यात मदत अशी काहीच नाही. कुठल्याही व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. मोदी फक्त घोषणा करतात, मोठे आकडे बोलतात. पण प्रत्यक्षात काही मिळाले असे आजवर कधीच झाले नाही, असा उद्योजकांचा एकूण सूर होता, असा दावाही तांबे यांनी केला. येत्या दोन दिवसात नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post