प्रशासन घेईना दखल.. खासदार झालेत हतबल; खा. डॉ. विखेंचा उद्वेग चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्हा प्रशासन खासदार म्हणून वा वैद्यकीय तज्ज्ञ म्हणूनही आपल्याला हिंग लावून विचारत नसल्याचा उद्वेग नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त करताना थेट स्वतःची खासदारकीच पणाला लावण्याची सुरू केलेली तयारी जिल्ह्यात चर्चेची झाली आहे. तब्बल ३ वर्षे गावोगावी आरोग्य शिबिरे घेऊन, त्यानिमित्ताने गावा-गावातील समर्थकांना एकत्रित आपल्यामागे उभे करून व दुसरीकडे काँग्रेसचे तिकीट मिळत नसल्याने व राष्ट्रवादीनेही नकार दिल्याने थेट भाजपची उमेदवारी घेऊन नगरची खासदारकी मिळवलेल्या डॉ. विखेंनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विचारत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही म्हणून थेट खासदारकीच सोडण्याची भाषा करणे आश्चर्यकारक मानले जात आहे. त्यामुळेच आता ४ ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या बैठकीत ते द्विवेदी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतात की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत नगर जिल्ह्याला केंद्र सरकारने दिलेल्या १८ कोटीच्या निधीतून कोरोनासाठी काय व कसा खर्च करावा, याबाबत खासदार म्हणून आपल्या सूचना प्रशासनाने घेणे डॉ. विखे यांना अपेक्षित आहे. पण या निधीतून झालेल्या खर्चाची माहिती दिली जात नाही वा निधी खर्च करताना खासदार म्हणून वा वैद्यकीय तज्ज्ञ म्हणूनही विश्वासात घेतले जात नाही, असा उद्वेग डॉ. विखेंचा आहे. त्यामुळेच ४ ऑगस्टच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पण यानिमित्ताने विखे कुटुंबाने मागील ५० वर्षात केलेल्या कामाची प्रशासनाकडून आता दखल घेतली जात नाही, असे नवे चित्र जिल्ह्यासमोर आले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे व डॉ. विखे भाजपचे खासदार आहेत तर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या महाआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हाताने डॉ. विखेंची कोंडी करणे तर सुरू नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच नगर शहर व जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहून नगरमध्ये किमान ५ दिवस कडक कर्फ्यू लावण्याची डॉ. विखेंची मागणी होती, पण ती फेटाळली गेली. त्यानंतर केंद्राने दिलेल्या १८ कोटीच्या निधीतून करावयाच्या कामांबाबत डॉ. विखेंना प्रशासनाने वा महाविकास आघाडी सरकारने विश्वासात घेतले नसल्याचे त्यांचेच म्हणणे आहे. अशा स्थितीत थेट खासदारकीच सोडण्याची त्यांनी केलेली भाषा पराभूत मानसिकतेचे दर्शन घडवून गेली आहे. ९ लाख मते घेऊन आपण निवडून आलो आहोत, पण जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदार त्यांना पाहिजे तसेच वागणार असतील तर त्यांनाच पुढच्या निवडणुकीत उभे करून आमदार-खासदार करा, असा डॉ. विखेंचा उद्वेग त्यांच्या समर्थकांनाही अस्वस्थ करून गेला आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या विकास वर्धिनी संस्थेच्या कोरोनामुक्त नगर अभियानातील फेसबुक संवादात डॉ. विखेंनी जिल्हाधिकारी द्विवेदींवर टीका करताना अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारवरही शरसंधान केले आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या व्यासपीठावरील डॉ. विखेंचे भाष्य त्या पदाधिकाऱ्यालाही काहीसे अडचणीत आणण्याची शक्यता आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे खा. डॉ. विखेंच्या प्रशासनाकडून होत असलेल्या कोंडीबद्दल खा. डॉ. विखेंचे वडील व माजी विरोधी पक्ष नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देण्याच्या डॉ. विखेंनी दाखवलेल्या तयारीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया आता उत्सुकतेच्या झाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post