नगर शहर राष्ट्रवादीवर काळाचा आघात; पक्षनिष्ठ धुत व गाडळकर यांच्या निधनाने शोककळा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर शहर व जिल्हा राष्ट्रवादीवर शुक्रवारी काळाचा आघात झाला. पक्षाशी व पक्ष नेत्यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धुत व शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी शोकाकुल झाली. धुत व गाडळकर यांच्या पक्ष निष्ठेच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धुत (वय ५८) यांचे हृदयविकाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मागील ४० वर्षांपासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. ते मूळचे कुकाणे येथील होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नगरला स्थायिक होते. नगरच्या माहेश्वरी समाजाच्या विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग होता. राष्ट्रवादीचे खंदे समर्थक असलेल्या धुत यांची शरद पवार यांच्या विचारांवर श्रद्धा होती. जिल्ह्यातील पवारांच्या निवडक जुन्या सहकाऱ्यांमध्ये धुत यांचा समावेश होता. राष्ट्रवादीच्या सत्तेच्या माध्यमातून राजकीय फायदा घेण्यापेक्षा पक्षविचार अल्पसंख्य समाजापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी भरीव योगदान दिले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. शुक्रवारी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

युवा कार्यकर्ता हरपला
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष व नगरचे आमदार संग्राम जगताप यांचे खंदे समर्थक बाबासाहेब गाडळकर (वय ३६) यांचे निधन नगरमधील राष्ट्रवादीच्या समर्थकांना शोकाकुल करून गेले. गाडळकर यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे वडील, आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, चार बहिणी, वहिनी असा परिवार आहे. गाडळकर हे आ. जगताप यांचे विश्‍वासू मित्र म्हणून सर्वपरिचित होते. नागरिकांच्या मूलभूत नागरी समस्या सोडविण्यात कायम अग्रेसर भूमिका त्यांनी घेतली. विविध सामाजिक उपक्रम व उत्सवात ते सक्रिय असायचे. बाबासाहेब गाडळकर यांना महापालिकेचे नगरसेवक होण्याची इच्छा होती व आ. जगताप यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना संधीही दिली होती. पण दुर्दैवाने या निवडी रखडल्या व गाड़ळकर यांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. दरम्यान, धुत व गाडळकर यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. धुत व गाडळकर यांनी पक्षासाठी भरीव योगदान दिले आहे. या सहकारी नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा भावनाही पवारांनी शोकसंदेशात व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post