गंभीर रुग्णांसाठी विखेंचे कोविड सेंटर सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : मधुमेह (डायबेटीस), रक्तदाब (बीपी) वा हृदयविकारासह (हार्ट) अन्य गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली असेल, तर अशा गंभीर रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनने विळद घाटातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वतंत्र २०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व आ. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या सेंटरचे गुरुवारी उदघाटन झाले. नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकाराने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. 

(कै.) श्रीमती सिंधुताई विखे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्याअंतर्गत हे कोविड सेंटर सुरू केले गेले आहे. यावेळी  महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे, सचिव अॅड. विवेक नाईक, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे उपस्थित होते. डॉ. विखे मेमोरियल हॉस्पिटलने याआधीच ५० खाटांचे कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. आता नव्याने सुरू झालेल्या केंद्रात सध्या ५० बेड सुविधा असून, ऑगस्ट अखेरीपर्यंत २०० बेडची व्यवस्था केली जाणार आहे. यातील ७० टक्के बेडला ऑक्सिजन-व्हेंटीलेटर सुविधा असणार आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत वा काही त्रास नाही, त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी गर्दी करण्यापेक्षा ज्यांना डायबेटीस, बीपी वा हार्ट समस्या आहेत, अशा रुग्णांनी येथे येण्याचे आवाहन खा. डॉ. विखे यांनी केले आहे. 

महापालिका व डॉ. विखे पाटील मेमोरियल फाउंडेशनमध्ये झालेल्या करारानुसार महापालिकेच्या केंद्रात स्वाब देणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी केली जात आहे. सध्या रोज ४५० रुग्णांची अशी होत असलेली तपासणी लवकरच रोज ६०० करण्याचे नियोजन सुरू आहे, असेही डॉ. विखे यांनी सांगितले. रुग्ण संख्या वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय सेवेला मर्यादा आल्या आहेत, त्यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच डॉ. विखे मेमोरियलसारख्या वैद्यकीय संस्थांचे कोविड केअर सेंटरचे काम नागरिकांना दिलासा देईल, असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला. लोणीला प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे १०० बेड व नगरला २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करणारी विखे फाउंडेशन ही राज्यातील पहिली संस्था असल्याचे गौरवोद्गार आ. विखे यांनी व्यक्त केले.

अवास्तव बिलांचा आरोप चुकीचा
खासगी रुग्णालयांतून कोरोना रुग्णांवरील उपचारांचे अवास्तव बिल लावून लुटालूट सुरू असल्याच्या आरोपावर खा. डॉ. विखे यांनी खंत व्यक्त केली. अवास्तव बिल आकारणी ही वास्तविकता नाही, कोरोनाच्या काळात सर्वांचेच जीव धोक्यात आहेत, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जीव गमवावे लागत आहेत, नर्स, झाडू कामगार, स्वच्छता कामगार, सुरक्षा कर्मचारी असे वैद्यकीय सेवेतील अन्य घटकही स्वतःचे जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यांच्यामागेही त्यांचे घरदार-कुटुंब आहे. त्यामुळे कोरोना उपचारांकडे आर्थिक दृष्टीने नव्हे तर मानवी दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post