एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : आघाडी सरकार पडणार असे म्हणणारे हे ‘अंजान ऍस्ट्रोलॉजर्स’ असून ऑपरेशन लोटसची फक्त अफवा आहे. प्रत्यक्षात रिव्हर्स ऑपरेशन होऊ शकते, असा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कुणाचेही नाव घेता विरोधकांकर हल्ला चढवला.
प्रफुल्ल पटेल व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी समर्थकांसह रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता फेटाळून लावली.
पार्थ पवार विषय मोठा नाही. कुठलाच वाद नसल्याने शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काही विषय उद्भवत नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. पार्थच नव्हे तर राष्ट्रवादीतील सदस्यांचे काही चुकत असल्यास त्यांची चूक दाखवण्याचा त्यांना अधिकार असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. संवाद व संपर्कासाठी उपलब्ध साधनांच्या आधारे काम करता येते. पंतप्रधान मोदी देखील मोजक्याच कार्यक्रमांसाठी बाहेर पडले, असाही टोला त्यांनी लगावला. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री झाले केंद्रात वजनदार मंत्री असताना काहीच झाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
महाआघाडीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. काँग्रेसकडे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना दोन मंत्रिपदे अधिक दिली. अशा स्थितीत काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही, असे म्हणणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष पूर्वी मोठा होता, त्यावेळी आम्ही लहान भावाची भूमिका बजाकली. आता राष्ट्रवादी पक्ष मोठय़ा भावाच्या भूमिकेत आहे. शरद पवार हे सर्वात मोठे नेते आहेत. त्याला आम्ही काय करू शकतो, असा चिमटा प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसच्या नाराजीच्या प्रश्नावर काढला. विदर्भात महापालिका व अन्य निवडणुकांमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला योग्य प्रमाणात जागा सोडव्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment