'प्लाझ्मा' दान करणाऱ्या कोरोनामुक्तांना देणार पुरस्कार; 'विकास वर्धिनी'ने घेतला पुढाकार


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांपैकी जे प्लाझ्मा दान करतील, अशा रुग्णांना 'जीवनदान' पुरस्कार येथील विकास वर्धिनी संस्थेद्वारे दिला जाणार आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात तयार झालेल्या अॅन्टीबॉडिजमुळे अशा रुग्णांच्या 'प्लाझ्मा'चा (रक्तातील एक महत्त्वाचा घटक) कोरोना उपचार घेत असलेल्या रुग्णांना फायदा होतो व कोरोनावर मात करण्यात त्यांना यश येते. त्यामुळे शासनासह प्रशासनाकडूनही कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विकास वर्धिनी संस्थेचे संचालक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी प्लाझ्मा दान करणाऱ्या कोरोनामुक्तांना विशेष जीवनदान पुरस्कार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यात साडेआठ हजारावर कोरोना रुग्ण असून, यातील साडेपाच हजारावर रुग्ण बरे झाले आहेत. तीन हजारावर रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालेल्या साडे पाच हजारावर रुग्णांनी प्लाझ्मा दान केले तर त्याचा फायदा कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांना होणार असल्याने अशा कोरोनामुक्त रुग्णांमध्ये त्याबाबत जागृती केली जाणार आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जाणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या व प्लाझ्मा दान करू इच्छिणारा रुग्ण १८ ते ५० वयोगटातील असावा, त्याचे वजन किमान ६० किलो असावे, त्याच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ पेक्षा जास्त असावे तसेच त्यांना मधुमेह-रक्तदाब वा हृदयविकाराचा त्रास नसावा, असेही त्यांनी स्पष्ट करून प्लाझ्मा देऊ इच्छिणारांनी सिव्हील हॉस्पिटलमधील मेट्रो ब्लड बँकेत संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post