'राठोड हूँ मै..' शिवसेनेचा व सामान्यांचा आधारवड कोसळला


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
''...निःशब्द... अखेर ९४२२२२१६०८ आज जनतेच्या सेवेतून निवृत्त झाला''....आणि...''प्रखर हिंदुत्वाची आस असलेला श्रीराम भक्त आज श्रीराम मंदिर उभारणी दिनी विसावला''....प्रातिनिधीक स्वरुपातील या दोन भावना बुधवारी नगरकरांच्या डोळ्यांत आसवे दाटून गेल्या. नगर शहरात तब्बल २५ वर्षे आमदारकी केलेल्या व नगरमध्ये एकदा निवडून आलेला पुन्हा निवडून येत नाही, असे बोलले जात असलेल्या काळात तब्बल ५ वेळा आमदारकी भूषवलेल्या अनिलभय्या रामकिसन राठोड नावाच्या व्यक्तिमत्वाच्या निधनाने नगर शहर व जिल्ह्यातील शिवसेनेसह सर्वसामान्यांचा आधारवड कोसळला. बुधवारी त्यांच्या पार्थिवाला अमरधाममध्ये आणल्यावर...''कोण आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला'', अशा घुमलेल्या आरोळ्या आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत असताना बाहेर ''जय भवानी, जय शिवाजी''चा झालेला गजर त्यांच्या लोकप्रियतेची पावती देणाराच म्हणावा लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून चौका-चौकांतून पोलिस तैनात होते, तरीही सामान्य नगरकर रस्त्याच्या कडेला उभे होते, जिल्ह्यातून शिवसैनिक आले होते, वाहनांना भय्याचे फोटो व त्यावर भगवा पंचा आणि हार घालून सच्च्या शिवसैनिकाविषयीच्या प्रेमाच्या भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाल्या.

कोरोनाची लागण झाल्याने आठ दिवसांपूर्वी नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेनेचे माजी आमदार व उपनेते अनिलभय्या राठोड (वय ७०) यांची प्रकृती सुधारत होती, पण अचानक बुधवारी पहाटे हृदयविकाराचा त्रास झाला व त्यातच पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. पत्नी, एक मुलगा व तीन मुली या परिवारातील सदस्यांसह त्यांच्यावर व त्यांच्या प्रखर हिंदुत्वावर प्रेम करणाऱ्या नगरकरांसाठी धक्कादायक बातमी होती. सोशल मिडियातून अनिलभय्यांविषयीच्या आठवणी अनेकांनी शेअर केल्या. 'नगरचा ढाण्या वाघ', 'अस्सल शिवसैनिक', 'सच्चा नेता', 'हिंदुत्वाचा लढवय्या' अशा अनेक शब्दांतून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त होत होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राठोडांना वाहिलेली श्रद्धांजली व त्यात त्यांच्या सच्चेपणाचा-पक्षनिष्ठेचा केलेला गौरव त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारा ठरला.
 

सामान्यांतून असामान्यत्वाची झेप
स्वतःच्या राजपूत समाजाची नगरमध्ये हजार-दीड हजार मते असतानाही १९९० ते २००९ अशी तब्बल २५ वर्षे आमदारकीच्या माध्यमातून नगरवर अधिराज्य गाजवणाऱ्या अनिलभय्या राठोड यांनी सामान्यत्वापासून असामान्यत्वेचा वस्तुपाठ घालून दिला तो स्वकर्तृत्वावर. कुटुंबात राजकीय वारसा नसताना, हाताशी सहकारी संस्था वा कारखान्यांची आर्थिक ताकद नसताना केवळ हिंदुत्व विचार तसेच कौटुंबिक कलहांपासून सामाजिक अन्यायापर्यंतचे नागरिकांचे छोटे-मोठे प्रश्न सोडवण्यासाठी २४ तास उपलब्धता या बळावर राठोडांनी नगरमध्ये २५ वर्षे आमदारकी केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व नंतर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर पदे व पैशांची आमीषे असताना राठोडांनी शिवसेना अखेरपर्यंत सोडली नाही. एवढेच नव्हे तर सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ च्या निवडणुकीच्या काळात भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांना उमेदवारीची ऑफर असतानाही त्यांनी ती नाकारली. २५ वर्षांच्या आमदारकीच्या काळात १९९५ ला राज्यात युतीची सत्ता आल्यावर दीड वर्षांसाठी राठोडांना अन्न व पुरवठा राज्यमंत्रीपद मिळाले. २५ वर्षाच्या काळात मिळालेले एवढेच सत्तेचे पद, पण त्या माध्यमातून त्या काळात अन्नधान्याचे दर पाच वर्षे स्थिर ठेवून राज्यातील गरीबांना आधार देणारे काम त्यांनी केले. अल्पसंख्याक बहुसंख्याक अशी ओळख असलेल्या नगर शहरातील छोट्या समाजघटकांना, रस्त्यावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना राठोडांचा आधार होता. डोळे बंद करून ते कैफियत ऐकायचे व नंतर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहून गरीबांना नडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने जोरदार शिवी हासडायचे व त्याला लगेच फोन लावून फैलावर घ्यायचे. ९०-९५ च्या काळात तर गरीबांचे प्रश्न घेऊन थेट अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकणारे व त्यांना धारेवर धरणारे राठोड आजही जुन्या पिढीतील अनेकांच्या आठवणीत आहेत. त्या काळात 'संपूर्ण संरक्षण-संपूर्ण सुविधा आणि निरंतर सेवा' या ब्रीदवाक्यासह प्रसिद्ध मारुती व्हॅनमधून फिरणाऱ्या राठोडांचे अनुकरण नंतर अनेक नेत्यांनी केले, त्यात काहींना यशही मिळाले. साखर व सहकार सम्राटांच्या जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार म्हणून राज्यात ते प्रसिद्ध होते. शिवसेना-भाजपच्या दिग्गज नेत्यांसह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे व अनेक नेत्यांचे ते मित्र होते. पण पक्ष विचार व मैत्री यांची सरमिसळ त्यांनी टाळली. मित्रांवर टीका करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

नशीब व मतविभागणीचे फायदे
राठोड मूळचे राजस्थानचे असले तरी त्यांचे वाडवडिल पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील अवसरीचे. वडील रामकिसन राठोड नगरला येऊन रॉकेलचा व्यवसाय करू लागले तर अनिलभय्यांनी पावभाजी व ज्युसचा व्यवसाय सुरू केला. त्याआधी मुंबईत नोकरी करीत असताना एका ज्योतिषाने त्यांना, 'तुमच्या नशिबात राजयोग असल्याने घरी नगरला जाऊन समाजसेवा करण्याचा' सल्ला दिल्याचे सांगतात. त्यामुळेच बहुदा अनिलभय्या नगरला आले व त्यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून काम सुरू केले. त्यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुखपद व १९९० ला तर विधानसभेची थेट उमेदवारीच मिळाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यासाठी वाडियापार्क मैदानावर रात्री उशिरा सभा घेतली व 'अनिल, माझा मुलगा आहे, त्याला निवडून द्या' असे नगरकरांना आवाहन केले. त्यानंतर त्या निवडणुकीत राठोडांनी इतिहास घडवला. तत्कालीन आमदार दादा कळमकर, माजी आमदार नवनीतभाई बार्शीकर व अरुण जगताप यांचा पराभव करून ते निवडून आले. १९९५ला त्यांनी पुन्हा कळमकर व शंकरराव घुले यांचा पराभव केला. १९९९ला कळमकर, ब्रिजलाल सारडा व अरुण जगताप या प्रतिस्पर्ध्यांना मात दिली. तर २००४मध्ये कळमकरांचा सरळ लढतीत चौथ्यांदा पराभव केला. २००९ मध्ये सुवालाल गुंदेचा व अभय आगरकर यांचा पराभव करून ते निवडून आले. पाचपैकी तीन निवडणुकांमध्ये मतविभागणीत राठोडांना यश मिळाले. २०१४मध्ये राज्यातील सेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यावर नगरमध्येही भाजप-सेनेच्या मतांची विभागणी होऊन राठोडांना ३ हजार मतांनी पहिला पराभव पाहावा लागला व त्यानंतर वर्षभरापूर्वी म्हणजे २०१९मध्येही त्यांचा पराभव झाला तो वाढत्या वयाने तरुणाईची सुटलेली साथ, पक्षांतर्गत बंडाळी, निवडून आलो तर मंत्रीच होणार अशा अतिआत्मविश्वासाने केलेल्या प्रचाराचा नकारात्मक परिणाम ११ हजार मतांनी पराभव होण्यात झाला. त्यामुळे नगर शहराची पाचवेळा आमदारकी भूषवणाऱ्या राठोडांना विजयाचा षटकार मारता आला नाही. विधान परिषदेवर नियुक्तीसाठीही त्यांनी प्रयत्न केले. पण राज्यभरात अनेक इच्छुक असल्याने राठोडांना त्यातही यश मिळाले नाही. 'विकास होतच राहतो व ती निरंतर प्रक्रिया आहे, कोणताही आमदार-खासदार वा मंत्री स्वतःच्या खिशातून विकास करीत नाही', अशी राठोडांची नेहमी भूमिका असे. शहरातील सामाजिक शांततेमुळे छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय सुरळीत चालू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते. पुणे-नाशिक व औरंगाबादच्या विकासाशी नगरची होणारी तुलना त्यांना चुकीची वाटत असे. पुणे विद्येचे माहेरघर असल्याने तेथे देशविदेशातून विद्यार्थी येतात, नाशिकला कुंभमेळ्यासाठी कोट्यवधीचा विकास निधी मिळतो तर औरंगाबादला वेरूळ-अजिंठा लेण्या पाहण्यास येणाऱ्या परदेशी पर्यटकांमुळे तेथे शासन विकास निधी देते, नगरमध्ये असा निधी शासनाने कधीच दिला नाही, एमआयडीसीला मदत केली नाही, मोठे उद्योग येथे येऊ दिले नाही, तसेच मी विरोधी आमदार असल्याने सत्ताधारी दोन्ही काँग्रेसने नेहमी नगर शहरावर अन्याय केला, माझ्यावर जातीयवादी राजकारणाचा आरोप करताना जिल्ह्यातील सहकार सम्राटांनी तरी नगर शहरासाठी कधी काय केले, अशी प्रत्युत्तरे ते सडेतोडपणे देत असत. विकासाबाबतची त्यांच्या भूमिकेबद्दल मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे, पण पक्षाचा निष्ठावान व सर्वसामान्यांचा आधार या निकषावर त्यांना मानणारा वर्ग नगर शहरातच नव्हे तर जिल्हाभरात आहे. श्रीरामपूर, संगमनेर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभांना गर्दी होत असे. कमरेवर दोन्ही हात ठेवून विठ्ठलाच्या पोझमध्ये 'सुनो भय्या, वो काम होना मंगता' असे बोलणारा भय्या व 'सेनास्टाईल'चे त्याचे 'खळ्ळ खट्याक' आंदोलन नगरकरांनी अनेकवेळा पाहिले आहे. भारनियमन, अकरावी प्रवेश, एमआयडीसी प्रश्न व डी झोन आंदोलन, रिंग रोड आंदोलन किंवा पुणे विद्यापीठ आंदोलन, नगरच्या उड्डाण पुलासाठी उपोषण, अशा अनेक आंदोलनातून राठोडांनी प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न केला. बिनधास्तपणा, सामान्यांविषयीची आत्मियता, व्यवस्थेविरुद्धची शिवीगाळीतून व्यक्त होणारी चीड, आंदोलनांतून गुन्हे दाखल होणे, दंगलीनंतर राज्यात पहिल्यांदा लागलेला टाडा व नंतर जेलवाऱ्या, अशा सगळ्या प्रसंगांना तोंड देताना स्थानिक स्तरावर अनेक जुन्या शिवसैनिकांनी साथ सोडली तरी एकट्याच्या बळावर शहरात सेनेचे अस्तित्व टिकवणारा धगधगता निखारा अखेर बुधवारी विझला. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात ते सक्रिय होते व आता सर्व अडचणी दूर झाल्या असताना या मंदिराचे भूमिपूजनही त्यांना पाहता आले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. 'अनिल भैया गेले, हा मोठा आघात...लोकांसाठी जगलेला नेता गेला'...अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड वाहिलेली श्रद्धांजली राठोडांची महती स्पष्ट करणारीच म्हणावी लागेल. त्यामुळेच नगरच्या राजकीय इतिहासात राठोडांचे नाव निश्चितच असणार आहे व आता त्यांच्यानंतरच्या शहर शिवसेनेच्या वाटचालीचेही कुतुहल असणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post