रोटरीच्या कोविड रुग्ण अन्नसेवेवर 'हायजिन'ची मोहोर


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : महापालिका व आय लव्ह नगर यांच्या मदतीने रोटरी क्लबद्वारे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू असलेल्या विनामूल्य रोटरी कोविड केअर सेंटरच्या अन्न सेवेचा गौरव नगरमधील हायजिन फर्स्ट चळवळीने केला आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चहा-नाश्ता व जेवण देण्यासाठी रोटरी कम्युनिटी किचन सुरू केले गेले आहे. या किचनद्वारे दिले जात असलेले अन्न दर्जेदार असून, त्याची स्वच्छताही पाळली जात असल्याने हायजिन फर्स्ट चळवळीद्वारे या कम्युनिटी किचनला मानांकन दिले गेले आहे.

हायजीन फर्स्ट या संस्थेकडून रोटरी कम्युनिटी किचनची २ वेळा पाहणी करण्यात आली होती. स्वच्छता, कचरा पेटी, ओला-सुका कचरा ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था, अन्न शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अॅप्रन, तसेच त्यांना मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल गन तपासणी इत्यादी गोष्टी रोटरीकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. किचनमध्ये अन्न तयार करण्यासाठीचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, शासनाने आखून दिलेल्या सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून या किचनमध्ये काम केले जात असल्याबद्दल हायाजिन फर्स्ट संस्थेकडून समाधान व्यक्त करण्यात आले व या कम्युनिटी किचनला हायजिन फर्स्ट मानांकन देण्यात आले.

यावेळी हायजिन फर्स्ट चळवळीच्या प्रणेत्या वैशाली गांधी यांच्यासह गीता गिल्डा, निर्मल गांधी तसेच प्रसन्ना खाजगीवाले, अमित बोरकर, क्षीतिज झावरे, निलेश वैकर, उमेश रेखे, अमृत कटारिया उपस्थित होते. या किचनमधून रोज १२० रुग्णांना विनामूल्य, ताजा, पौष्टिक आणि सकस आहार पुरवला जातो. या रोटरी कोविड सेंटरसाठी जैन ओसवाल युवक संघ, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान, इंटेरिअर डिझायनिंग असोसिएशन, संत निरंकारी आश्रम, विजेता क्रिकेट क्लब, इनरव्हील क्लब व्हिनस, सहज फाऊंडेशन अशा विविध संस्थांनी सहकार्य केले आहे. या सेंटरसाठी रफिक मुंशी, दिगंबर रोकडे, ईश्वर बोरा, देविका रेळे, पुरुषोत्तम जाधव, सुयोग झंवर आदी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post