करोनावरील ‘कोविशिल्ड’ लसीबद्दलचं ‘ते’ वृत्त खोटं; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : करोनावर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटनं ‘कोविशिल्ड’ लस शोधून काढली असून, त्या लसीच्या उपलब्धतेविषयी काही माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्या वृत्ताच सिरम इन्स्टिट्यूटनं खंडण केलं आहे. ‘कोविशिल्ड’ लसीच्या उपलब्धतेविषयी जे वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे, ते खोटं असून, अंदाजानं दिलेले आहे, असं सिरम इन्स्टिट्यूटनं स्पष्ट केलं आहे.

देशासमोर करोनानं मोठं संकट उभं केलं असून, करोनाच्या नियंत्रणाबरोबरच त्यावर लस शोधण्याचं काम देशात सुरू आहे. यात सिरम इन्स्टिट्यूटला यश आलं असून, ‘कोविशिल्ड’ लसीच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, चाचण्या सुरू असतानाच ही लस ७३ दिवसांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. हे वृत्त सिरम इन्स्टिट्यूटनं फेटाळून लावलं आहे. ७३ दिवसांत करोनावर लस उपलब्ध होणार असल्याच्या वृत्तावर सिरमनं स्पष्टीकरण दिलं आहे.

'कोविशिल्ड'च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे दावे केले जात आहेत, ते पुर्णपणे खोटे व अंदाजावर आधारित आहेत. सध्या केंद्र सरकारनं आम्हाला फक्त लस तयार करण्याची परवानगी आणि भविष्यातील वापरासाठी ती साठवून ठेवण्याची परवानगी दिली आहे. कोविशिल्डच्या सर्व चाचण्या एकदा यशस्वी झाल्या आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही लस विक्रीसाठी उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड-अँस्ट्राजेनेका लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस रोगप्रतिकारक आणि प्रभावी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट त्यांच्या उपलब्धतेविषयी अधिकृतपणे माहिती देईल, असं सिरमनं म्हटलं आहे.

सिरम इन्सिस्ट्यूटनं विकसित केलेली करोनावरील लस ७३ दिवसांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं दिलं होतं. भारतातील ही पहिली लस ७३ दिवसांनी उपलब्ध होणार असून, केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार असल्याचं वृत्तामध्ये म्हटलेलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post