क्रांतिसूर्य राजगुरूंवर होणार मराठी वेबसिरीज


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले "क्रांतिवीर राजगुरू' यांच्या जीवनावर आधारित "क्रांतिसूर्य हुतात्मा शिवराम राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा' ही मराठी वेबसिरीज राजगुरू परिवाराकडून तयार केली जात आहे. तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने सध्याच्या ऑनलाइनच्या जमान्यात "ओटीटी प्लॅटफॉर्म'च्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज वेबसिरीजच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला जाणार आहे.

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन उन्मत्त इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. कीर्तीसाठी किंवा घरादारात गुंतून न पडता मातृभूमीसाठी या तिघांनी आपल्या आयुष्याचे अग्निकंकण केले. या त्रिमूर्तींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हा स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. "इन्कलाब झिंदाबाद', "मेरा रंग दे बसंती चोला'चा नारा देत या भारतमातेच्या तीन सुपुत्रांनी ब्रिटीशांच्या साम्राज्यशाही विरोधात लढा उभारला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करले. घरादारावर तुळशीपत्र ठेवून भारतमातेसाठी शहीद झाले. या महान तीन क्रांतिवीर देशभक्तांपैकी महाराष्ट्राची शान असणाऱ्या राजगुरू यांच्या आयुष्यावरील ही वेबसिरीज असणार आहे. २४ ऑगस्टला क्रांतिसूर्य शिवराम हरी राजगुरू यांच्या ११३व्या जयंतीनिमित्त काव्या ड्रीम मुव्हीज अंतर्गत होणाऱ्या या वेबसिरीजच्या पोस्टरचे ऑनलाइन अनावरण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरुनगर) येथे जन्मलेला शिवराम हरी राजगुरू नावाचा मुलगा क्रांतिकारक कसा झाला, याची कहाणी या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. 

लेखन आशिष निनगुरकर यांचे आहे. या वेबसिरीजची मूळ कल्पना विलास राजगुरू यांची असून, अभिनेता गणेश मयेकर, जयराज नायर, आनंद वाघ, अजित वसंत पवार व प्रदीप कडू, तसेच कॅमेरामन योगेश अंधारे, कार्यकारी निर्माता प्रतिश सोनवणे, स्टील फोटोग्राफर सिद्धेश दळवी, सहाय्यक दिग्दर्शक स्वप्नील निंबाळकर,सहाय्यक निर्माते सुनील जाधव,पोस्टर डिझाइनर कल्याणी भरांबे व संकलक अभिषेक लगस, सहाय्यक दिग्दर्शक स्वरूप कासार व बालकलाकार अनुराग निनगुरकर, यात असल्याची माहिती वेबसिरीजचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धेश राजगुरू यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post