ज्योति भोई आत्महत्या प्रकरणी कारवाईची मागणी; अष्टेकर यांनी दिले निवेदन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जळगाव जिल्हयातील अंमळनेर येथील ज्योती भोई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी सदस्या स्मिता अष्टेकर व रेखा जरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भोई यांनी मला (स्मिता अष्टेकर) फोन करून नगर शहरातील एका पोलिस अधिकार्‍याची व एका महिलेच्या प्रेम प्रकरणाची माहिती सांगितली व ते आपल्यास त्रास देत असून ते दोघे माझी (ज्योती भोई) सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करीत आहेत. या बदनामीमुळे जीवन जगणे अवघड झाले आहे, असे त्यांनी सांगितले होते. संबंधित पोलिस अधिकार्‍यांनी अंमळनेर येथील एका मागासवर्गीय महिलेस हाताशी धरून माझ्यावर (भोई) खोटा गुन्हा दाखल केला आहे, असेही त्यांनी सांगितल्याचे अष्टेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ज्योती भोई यांनी माझ्या (अष्टेकर) यांच्या मोबाईलवर (व्हॉटसअ‍ॅपवर) त्यांना त्रास देणार्‍या व आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यांच्या ऑडिओ क्लिप, बदनामीकारक मेसेजस्चे स्क्रीनशॉट तसेच अधिकार्‍यांना दिलेले निवेदन आदी सर्व बाबी सीडीमध्ये सेव्ह करून पाठपुराव्यासाठी निवेदनासमवेत देण्यात आले आहे. तसेच फेसबुकवर ज्योती भोई यांची बदनामी करणारांचे स्क्रीनशॉट निवेदनास जोडले आहे. ज्योती भोई यांना न्याय मिळावा, अशी मागणी अष्टेकर यांनी केली आहे. भोई यांच्याविषयी सोशल मिडियावर (फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप) अश्‍लिल मेसेजेंस् पाठवून त्यांची बदनामी करण्यात आली, ही बदनामी करताना गलिच्छ भाषेत मेसेज पाठवून करण्यात आली. संबंधित भोई यांना त्यांच्या मोबाईलवर धमक्याही देण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी जळगाव येथील पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. परंतु पोलिस अधिकार्‍यानी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असा दावाही अष्टेकर यांनी या निवेदनात केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post