एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : सोनिया गांधी काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद सोडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि यानंतर सोनिया गांधी यांनी 1 वर्षांसाठी अंतरिम अध्यक्षपद स्वीकारले. मात्र त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपला असून पुढे त्या अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक नसल्याचे वृत्त आहे. उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता याच संदर्भात काँग्रेस वर्किंग कमिटीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन अध्यक्ष कोण? यावर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यात त्यांनी पक्षात वरून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिणाऱ्यात 5 माजी मुख्यमंत्री, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, खासदार आणि अनेक माजी केंद्रीय मंत्री आहेत. पूर्णकाळ आणि फिल्डवर सक्रिय असणारा अध्यक्ष, वर्किंग कमिटीमध्ये निवडणूक आणि तरुणांना प्राधान्य देण्याची मागणी यात करण्यात आली. यामुळे पक्षात जोश येईल, असे सर्वांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षातील एक गट राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्यावर ठाम आहे. दोन दिवसांपूर्वीच पक्षाने मीडिया ब्रिफिंग दरम्यान देशभरातील कार्यकर्ते राहुल गांधी यांनाच अध्यक्ष म्हणून पाहण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. मात्र काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी पुढील अध्यक्ष ‘गांधी’ घरण्या व्यतिरिक्त असू शकतो असे संकेत दिले होते. आता उद्याच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Post a Comment