'सुशांतएवढी चर्चा दूधाच्या, ऊसाच्या प्रश्नावर झाली असती तर...'


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : 'सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला कलाकार होता, याबद्दल दुमत नाही. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होतेय, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते,' अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज व्यक्त केली.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या आधी बोलताना शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्यामध्ये एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर तोफ डागली. राज्यात एकीकडे दूध आंदोलन पेटले असताना दुसरीकडे भाजप व इतर पक्ष सुशांतसिंह प्रकरणावर जास्त लक्ष देत आहेत का? असे विचारले असता राजू शेट्टी म्हणाले, 'राज्यात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एवढेच काय तर अनेक करोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर एवढी चर्चा होते. तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या ऊसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल, लॉकडाऊनमुळे ज्या कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरं वाटलं असतं. माझ्या आंदोलनावर ज्यांना टीका करायची आहे, त्यांनी खुशाल करावी. मी यावर यापूर्वीच खूप काही बोललो आहे. आता त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

दूध प्रश्‍नावर राज्यामध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. 'शेतकऱ्यांसाठी कोणी आंदोलन करीत असेल, त्या आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल, तर अशा आंदोलनाला आमची अजिबात हरकत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणखी कोणाला आंदोलन करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. मात्र आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे. मग असे आंदोलन राजकीय नाही का, असा सवालही त्यांनी केला. दूध उत्पादक प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी देखील डोळेझाक केली आहे. दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post